बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शीतील शाखेकडून रिझर्व बँकेला पाठविलेल्या काही नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भरणा केलेल्या नोटा कर्मचार्‍यांनी संगणमताने भरणा केल्या की निष्काळजीपणामुळे याचा पोलिस तपास सुरु झाला आहे.
    शहरातील बसस्थानकासमोरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या मुख्य शाखेकडून रिझर्व बँकेला सुमारे पाच हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा भरणा करण्यात आल्या. रिझर्व बँकेतील अद्ययावत मशिनरीतून सदरचा प्रकार उघडल झाल्यानंतर अज्ञात व्यक्तिविरोधात बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर जयश्री परदेशी या रोखपाल यांनी बार्शी पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल केली आहे. सदरच्या बनावट नोटांमध्ये एक हजारांच्या दोन, पाचशे रुपयांच्या सहा, शंभर रुपयांच्या चार अशा पाच हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश असून त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
    स्‍टेट बँकेच्‍या बार्शी शाखेने रिझर्व बँकेकडे जानेवारी 2011 ते फेब्रुवारी 2014 पर्यंत वारंवार रक्‍कम पाठवून भरणा केला होता. नागरिकांनी फाटक्‍या नोटा बदलण्‍यासाठी आणलेल्‍या तसेच बंडलमधील नोटा बनावट आहेत, हे मशिनने तपासणी करुनसुध्‍दा बँकेच्‍या निदर्शनास आले नव्‍हते, असे जयश्री परदेशी यांचे मत आहे.   
    यापूर्वीही काही एटीएममधून काढलेल्‍या नोटा बनावट असल्‍याचे दुस-या बँकेत उघड झाल्‍याची अनेक उदाहरणे झाली आहेत. एका बँकेमधून काढलेल्‍या रक्‍कमेत बनावट नोट आढळल्‍याचे एस.बी.आय. शाखेत निष्‍पण्‍ण झाल्‍यानंतर त्‍यांनी त्‍या बँकेकडे परत देण्‍यास टाळून तसेच समारोसमोर करणे, तपास करणे, अथवा खात्री करण्‍याचे सोडून आम्‍ही ती नोट जाळणार आहोत, असे सांगून त्‍यांच्‍या ताब्‍यात घेतली. अशा प्रकारच्‍या अनेक जणांच्‍या तक्रारी नियमितपणे सुरु असतात. परंतु सदरच्‍या जमा केलेल्‍या नोटा या जाळण्‍याऐवजी, नष्‍ट करण्‍याऐवजी स्‍वतःच्‍या ताब्‍यात ठेवल्‍या जातात व आलेल्‍या तक्रारदारांना पोलिसांची भिती दाखवून व तुमच्‍यावर मोठा गुन्‍हा दाखल करतो, असे धमकावून परत पाठविले जाते. वेळप्रसंगी संरक्षणासाठी असलेल्‍या पोलिसांकडून बाहेर हाकलून लावले जाते. सदरच्‍या अनेक प्रकारातील बँकेच्‍या कर्मचा-यांकडे जमा असलेल्‍या नोटा पुन्‍हा चलनात वापरतात, एटीएम मध्‍ये वापरतात की त्‍या बदलून कर्मचा-यांच्‍या खिशात जातात, अशी शंका अनेकांनी व्‍यक्‍त केली आहे. अशा प्रकारच्‍या बनावट नोटा असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर त्‍या जाळण्‍याचा तसा त्‍यांना अधिकार आहे की नाही याची प्रसिध्‍दीपत्रके लावण्‍यात आली नसल्‍याने ते देखील उघड होत नाही. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोस हे करीत आहेत.
 
Top