उस्मानाबाद -: जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने भरीव मदत दिली असून टंचाई परिस्थितीच्या काळात नागरिकांना आधार  देण्याचे काम केले आहे. एकात्मिक विकासावर राज्य शासनाचा भर असून तात्पुरत्या उपायांबरोबरच दीर्घकालिन विकास आणि व्यापक जनहित समोर ठेवून काम करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
     भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण श्री.  चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. जिल्हाधिकारी डॅा. प्रशात नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांची यावेळी उपस्थिती होती.
      पालकमंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्य शासन जनतेसाठी करीत असलेल्या विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी दिली. राज्य शासनाने संपूर्ण जिल्ह्यात टंचाईसदृश्य स्थिती जाहीर केली. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी पंपाच्या वीज बिलांमध्ये ३३ टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांची फी माफी आणि  सारामाफी या सवलती देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
   गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांमध्ये नळपाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी अडचणीची ठरणारी लोकवर्गणीची अट काढून टाकली. त्याचा लाभ आपल्या जिल्ह्याला होणार आहे. सिंचनक्षमता वाढविण्यासाठी यावर्षी दुष्काळप्रवण तालुक्यांमध्ये सिमेंट साखळी बंधारे बांधण्याचा कार्यक्रम  शासनाने हाती घेतला. कालच जिल्ह्यातील सिमेंट नाला बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १९१ कोटी रुपयांची मदत देण्यात आली, असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. 
     जिल्हा वार्षिक योजनेतून नगरपरिषद कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भरीव निधी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
      यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणा-या जिल्ह्यातील सिंधू सुभाष सरवदे आणि बाबई लक्ष्मण चव्हाण या समाज कार्यकर्तींना राज्य शासनाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे सांगितले.
        जिल्ह्यात महसूल मंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक विकासकामे गावोगावी होत आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय युवक मेळावे घेऊन प्रत्येक गाव व्यसनमुक्त आणि निर्मल व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी या उपक्रमांना पाठबळ द्यावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
      रमाई आवास योजना, विमुक्त भटक्या समाजाकरिता विशेष प्रयत्न, व्यसनमुक्तीसाठी धोरण, आरोग्याच्या विविध योजना आपण राबवित आहोत. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या उन्नतीसाठी विविध योजना राज्य शासन राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले.
     या कार्यक्रमाला विविध भागातून आलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी खा. डॉ.पदमसिंह पाटील, विश्वास शिंदे,अप्पासाहेब पाटील, यांच्यासह विविध पदाधिकारी,  सद्स्य, अप्पर जिल्हाधिकारी जे. टी, पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, उजिल्हाधिकारी सर्वश्री बी. एस. चाकूरकर, शिल्पा करमरकर, प्रभोदय मुळे, श्रीरंग तांबे, उपविभागीय अधिकारी अविनाश बोधवड, तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक व पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
    यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लघुउद्योजक, यशस्वी विद्यार्थी तसेच मातृत्व संवर्धन दिन उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संस्थांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हनमंत पडवळ यांनी केले. 
 
Top