उस्मानाबाद -  विविध शासकीय योजनांची माहिती प्रत्येक शेतक-यांपर्यंत पोहोचावी, या योजनांचा लाभ घेऊन त्याने उन्नती साधावी, गटशेतीच्या माध्यमातून प्रगती साधावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या  पुढाकाराने शेतकरी गट निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून सुरुवातीच्या टप्प्यात उस्मानाबाद आणि भूम तालुक्यांनी गट निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. इतर तालुक्यातही तात्काळ गट निर्मितीची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.
         सध्या जिल्ह्यात किती शेतकरी आहेत. त्यांनी आतापर्यंत कृषी व कृषी संलग्न योजनांचा किती लाभ घेतला, त्यांच्यासाठी कोणत्या योजना देता येतील आदींची एकत्रित माहिती संकलित करण्यात येत आहे.  यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माहितीचा अद्यावत असा डेटाबेसच तयार होत आहे. त्यामुळे या माहितीचा उपयोग वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांबरोबरच विविध शासकीय यंत्रणांनाही होणार आहे.
         जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या माध्यमातून गटशेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. संसाधनांचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने  कीड व रोगांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी, उत्पादन वाढविण्यासाठी, काढणीत्तोर हाताळणी, प्राथमिक  प्रक्रिया, विपणनास चालना देण्यासाठी समूह तथा गटशेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. 
        वेळेवर कर्जपुरवठा, गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा वेळेवर पुरवठा, मजुरची उपलब्धता, पेरणी ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री  उपलब्धता, पीक संरक्षणाची व्यवस्था, ग्रेडींग, पॅकींग, बाजारपेठेची अद्यावत माहिती देणे हा या गटशेतीचा उद्देश आहे.  राज्यात उस्मानाबाद जिल्ह्याने गटशेती निर्मितीसाठी आघाडी घेतली असून सर्व शेतकऱ्यांचा या शेतकरी गटात समावेश असणार आहे. जिल्ह्यात एकूण 20 हजार 500 गट स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनीही व्यक्तिशा लक्ष घालून या कामाला गती दिली आहे. त्याचबरोबर, दर आठवड्यास यासंदर्भातील आढावा घेतला जात आहे.
        मोठ्या प्रमाणात गटनिर्मितीसाठी  प्रयत्न करण्यात येत असून शेतकऱ्यांकडून माहिती संकलित केली जात आहे. कृषी सहायकांबरोबरच कृषी मित्रांचीही मदत याकामी होत आहे.  संकलित केलेली माहिती कृषिमित्र या नव्याने तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलवर टाकली जाणार आहे. यामुळे शेतकरी गट निर्मिती, विविध योजना राबविण्यासाठी लाभार्थी निवड यासाठी माहितीचा हा डाटाबेस उपयुक्त ठरणार आहे.       ****
 
Top