तुळजापूर -: राज्याच्या विकासाचा कणा शेतकरी आहे. दुष्काळासारख्या परिस्थितीवर मात करत शेतक-यांनी मानसिकता तयार करुन आपला व्यवसाय सुरु ठेवला आहे. शेतक-यांच्या मालाची साठवणूक करणे, योग्य भाव देऊन त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, उत्पादनाचे साधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजारसमितीच्या गोडाऊन व गाळयांना शेतक-यांचे हित लक्षात घेऊन शासनाकडून मंजूरी दिली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
    कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर अंतर्गत नुतन कार्यालय इमारत उदघाटन तसेच बाजार समिती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या नुतन कार्यालय इमारत, शेळी व मेंढी स्वतंत्र बाजार, गोदाम भूमिपूजन  आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विखे पाटील बोलत होते. यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री अब्दुल सत्तार, परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम गारळे, अप्पासाहेब पाटील, अशोक मगर, पंचायत समिती सभापती सौ.मनिषा पाटील, सुनिल चव्हाण, कृषी सभापती पंडीत जोकार, कृषि उत्पन्न  बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
     राज्य शासनाने विविध शेती मालाच्या आधारभूत किंमतीवर मालाची खरेदी करुन शेतक-यांना मदत केली आहे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी राज्याच्या बैठकीत प्रश्न मांडून अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केला आहे, ही बाब कौतकास्पद आहे. शेतक-यांची सोयाबीन बियाणांवर विविध कंपन्याकडून फसवणूक झाली असून त्या कंपनीवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंद करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्याहितासाठी शासन  सर्वतोपरी प्रयत्न करीत असून खरीप, रब्बी व गारपीठग्रस्त शेतक-यांना शासनाने भरीव अनुदान देऊन मदत केली आहे, असे  विखे पाटील यांनी सांगितले. 
      यावेळी हर्षवर्धन पाटील शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मराठवाडयाच्या विकासासाठी कै. विलासराव देशमुख यांनी राजकीय ताकदपणाला लावली होती. मराठवाडा विकासाच्या बाबतीत पुढे गेला पहिजे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंत्रीमंडळात मधुकरराव चव्हाण यांनी या भागातील सर्वसामान्य शेतक-यांच्या बाबतीत विविध प्रश्न मांडून विकास करण्याचे  कार्य त्यांनी केले आहे, ही बाब अभिनंदनीय आहे. जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देतांना जास्तीच्या व्याजाची आकारणी करण्यात येत आहे, अशा तक्रारी प्रापत झाल्या असून  कोणत्याही बँकेने शेतक-यांच्या व्याजावर जास्तीची टक्केवारी आकारु नये, अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना त्यांनी यावेळी दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि साखर कारखाने अडचणीत आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी  शासनस्तरावरुन सर्व सामान्य शेतक-यांचे हित लक्षात घेऊन विशेष पॅकेज देण्याची भूमिका घेणार असून राज्याकडून मदत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील,अशी ग्वाही  पाटील यांनी यावेळी दिली.
     अब्दुल सत्तार यांनी तुळजापूर विकास कामांची पहाणी केली असून नगर परिषद व प्राधिकरणामार्फत रस्ते व यात्रेकरुसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मंत्री मंडळात दुष्काळबाबतची मागणी मधुकरराव चव्हाण यांनी सर्वप्रथम मांडली. त्यांचे मी मनापासून कौतूक करतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने टंचाई परिस्थितीवर सर्वकर्ष निर्णय घेऊन सर्वांना दिलासा दिला आहे.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे, प्रास्ताविक सुजित हंगरगेकर यांनी केले तर आभार अॅड.धीरज पाटील यांनी मानले.
 
Top