उस्मानाबाद : मुस्लिम असेल तर मक्केला जातो, हिंदु असेल तर पंढरपूरला वारीसाठी जातो परंतु आम्ही आयुष्यभर अपंगवारी करणार असुन अपंग हीच आमची जात आणि धर्म असल्याचे मत आ.बच्चु कडू यांनी येथे आयोजित अपंगाच्या भव्य रोजगार मेळाव्यास व्यक्त केले.
यावेळी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, आ.ओमराजे निंबाळकर, हिंदवी परिवारचे संस्थापक अध्यक्ष शिवरत्न शेटे, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, उस्मानाबादचे नगराध्यक्ष सुनिल काकडे, काँग्रेस (आय) चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, नगरसेवक सोमनाथ गुरव, पत्रकार धनंजय रणदिवे, सांजा गावचे सरपंच श्रीराम सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष महादेव खंडाळकर, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बच्चु कडू म्हणाले की, गाडगे बाबा लोकांना सतत विचारत असत की, वारे पाहिलं का आणि लोक आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे हो म्हणायचे परंतु ते दिसले का म्हटल्यावर मात्र ते गप्प बसायचे वारे पाहता येत नाही परंतु त्याच्या शिवाय जगताही येत नाही वारे जसे जात, धर्म, पंथ पाहत नाही तसेच आपलेही मन असावे. लग्न करत असताना आपण चांगला दिवस पाहतो परंतु दिवस कुठलाही असु द्या. माणुस चांगला असावा लागतो. कोणतीही गोष्ट करत असताना ती गोष्ट मनातून केली पाहिजे. त्यासाठी ती मनात आली पाहिजे. सरकार मोठ्या ताकदीने मंदिर-मस्जिदी बांधल्या जातात. तेवढ्याच ताकदीने अपंगाच्या समस्या सोडविल्या गेल्या पाहिजेत. आपण निवडुन दिलेल्या आमदारांना ७५ हजाराचे मासिक मानधन असते.
कलेक्टरला लाखभर रुपयांचा पगार असतो. लाईटबील, डिझेल आदि गोष्टीमध्ये सुविधा असुन देखील ते कधी एका अपंगाच्या घरी भेटायला जातात काय? असा सवालही यावेळी त्यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, अर्थसंकल्पाचे पहिले पान हे अपंगासाठी, दुसरं पान शेतक-यांसाठी तर तिसरे पान हे शहिदांच्या घरच्यासाठी लिहिले गेले पाहिजे. आपल्या देशामध्ये कुत्र्या-मांजरांच्या नोंदी होतात परंतु अपंगाच्या नोंदी होत नाहीत. परंतु तुम्हीही जागृत व्हा तुमच्या नोंदीसंबंधी शासकीय जी.आर. असुन ग्रामपंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेत नोंद करुन घ्याव्यात असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, अपंगाना स्वत:ला अपंग समजू नये तसेच अपंग शब्द वापरण्यास कायद्याने बंदी असुन मी अपंगाना मदत म्हणून २० सायकली विकत घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी शिवरत्न शेटे यांनी आपले मनोगतात अपंगानी सकारात्मक विचार करुन दु:खावर मात करावी. जीवन सुंदर आहे ते जगले पाहिजे. जरी आपण शरीराने अपंग असलो तरी मनाने अपंग नाही आहोत हे दाखवुन दिले पाहिजे.
जीवनात जेव्हा जेव्हा वाईट प्रसंग येतील तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आठवावा जसे त्यांनी जात, धर्म, पंथ कधीच पाहिला नाही तसेच आपण अपंग आहोत हा विचार मनातून काढून टाकावा असे सांगितले.
तर आ.ओमराजे म्हणाले की, आपल्यात कांही कमी आहे म्हणून रडत बसु नका तर अपंगत्वावर मात करा. तुम्ही अपंग असतानाही जगता तुमच्या जिद्दीला प्रणाम असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले तर सुत्रसंचलन वैभव आगळे व आभार अशोक मोहिते यांनी मानले. हा मेळावा यशस्वीतेसाठी अग्निवेश शिंदे, गजानन काकडे, राजसिंह निंबाळकर, जयराज खोचरे, विष्णु इंगळे, अभिजित निंबाळकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
 
Top