उस्मानाबाद  -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने उस्मानाबाद येथील बसस्थानक परिसरात, नुतन बसस्थानक व व्यापारी संकुलाचे भुमिपुजन  दि. 24 ऑगस्ट रोजी परिवहन मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते  करण्यात आले.
    यावेळी एस.टी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, डॉ. पद्मसिंह पाटील, राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, न.प. अध्यक्ष सुरेश काकडे, अरविंद गोरे, नरेंद्र बोरगावकर, विश्वास शिंदे, बाळासाहेब पाटील, एल.एल.पाटील, बाळासाहेब एखंडे, एस.टी.महामंडळ औरंगाबादचे व्यवस्थापक बोडीवाले,  विभाग नियंत्रक भानप आदि उपस्थित होते.
    यावेळी बोलताना परिवहनमंत्री चव्हाण म्हणाले की, प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा दिल्या जातील. बसस्थानक अत्याधुनिक पध्दतीने बांधले जाणार असून एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधेसह दर्जेदार गणवेश देण्यात येतील. या कर्मचाऱ्यांवर कामाचा कोणताही ताण तणाव येणार नाही याची खबरदारी एस.टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सुचना त्यांनी दिल्या. आजच्या घडीला जेथे गाव व रस्ता आहे तेथे एस.टी.बस आपल्या जिल्हयासह पुर्ण राज्यात चालु आहे. खाजगी वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्यामुळे या स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुन एस.टी. चे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला पाहीजे असेही त्यांनी सांगीतले.
    एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे म्हणाले की, आपल्या जिल्हयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. येथील जनतेने नवीन बसस्थानकाची मागणी केली व योगायोग म्हणजे परिवहनमंत्री व अध्यक्ष हे एकाच जिल्हयाचे असल्याने या कामास गती मिळाली. बसस्थानक व व्यापारी संकुल बी.ओ.टी तत्वावर बांधण्यात येणार असून सर्व सुविधेनिशी राज्यात अव्वल असणार आहे. या एस.टी.चे चालक, वाहक व यांत्रिक या त्रिमुर्तीने  एस.टी. महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी सांगीतले. या कर्मचाऱ्यांनी प्रवासी हे आपले दैवत आहे. त्यांची सेवा करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्याबरोबर सौजन्याने वागावे असे त्यांनी सांगीतले. एस.टी चा प्रवास हा सुरक्षित प्रवास असल्याने प्रवास करतात, त्यामुळे वेळेचे बंधन पाळुन आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.
    लोकसंख्येच्या मानाने एस.टी. बसेसची संख्या वाढवुन प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार सुविधा दिल्या पाहिजेत असे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सांगीतले.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. औरंगाबाद एस.टी. महामंडळाचे व्यवस्थापक बोडीवाले यांनी स्वागत केले. तर पुणे येथील शाहीर कुमारपाठक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा  सादर केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. यावेळी एस.टी. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.   
 
Top