उस्मानाबाद -  येथिल एका सेवानिवृत्त प्राचार्याने मद्यधुंद अवस्थेत मुलींच्या वसतीगृहात घुसून गोंधळ घातला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेला हा खळबळजनक प्रकार आता उजेडात आला आहे. यापूर्वीही या महाभागाने दोन ते तीन असे गैरकृत्य केले आहे. वेळीच त्याच्यावर महाविद्यालयाच्या प्रशासनाने कारवाईचा बडगा न उगारल्यामुळे वसतिगृहगातील मुलींमध्ये सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन प्रशालेत शिक्षण घेणा-या मुलींसाठी महाविद्यालय परिसरातच वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या मुलींची या वसतिगृहांमुळे चांगली सोय झालेली आहे. परंतु, गेल्या कांही महिन्यात ज्यांच्या नियंत्रणाखाली महाविद्यालय चालते, अशा जबाबदार व्यक्तिंकडूनच गैरवर्तन होत असल्याचे समोर आले आहे.
शासकीय तंत्रनिकेतन प्रशालेचे प्राचार्यपद भुषविलेल्या एका सेवानिवृत्त प्राचार्याने पदाला लाजवेल असे गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेतील सेवानिवृत्त प्राचार्य त्यांच्या शासकीय निवासस्थानाजवळच असलेल्या मुलींच्या वसतीगृहात शिरल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पदावर असताना हे उच्चपदस्थ महाशय संध्याकाळचे जेवन मुलींच्याच पंगतीत बसून मेसमध्ये घेत होते. त्यावेळी बहुतांशवेळा ते मद्यधुंद अवस्थेत असत. असाच प्रकार स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाही घडला. सेवानिवृत्तीनंतर देखील हे महाशय शासकीय निवासस्थानी ठाण मांडून आहेत. ते सेवानिवृत्त असतानाही त्यांना मुलींच्या वसतीगृहात जाण्याची परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गेल्या जुलैअखेर हे प्राचार्य महोदय सेवानिवृत्त झाले आहेत. असे असले तरी त्यांनी अद्याप शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. ते जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे रहिवाशी असून आठवड्यातून एकदोनदा उस्मानाबादेत येतात. येथे आल्यानंतर त्यांचे जेवन मुलींच्या वसतिगृहातील मेसमध्येच होत असल्याचे समजते. परंतु, सततच्या या प्रकाराला वेळीच पायबंद घालण्यात आला नसल्याने असे प्रकार वारंवार घडत गेले.
आठवडाभरापूर्वीही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हा सेवानिवृत्त उच्चपदस्थ उस्मानाबादेत मुक्कामास होता. त्यावेळी त्यांनी मद्य प्राशन केले होते. मद्यधुंद अवस्थेतच जेवणासाठी त्याने मुलींची मेस गाठली. त्यांच्याबरोबर जेवणही सुरू केले. परंतु, याचवेळी या प्राचार्यास दारुच्या अतिप्राशनामुळे उलट्या सुरू झाल्या. या सर्व प्रकाराचा वसतिगृहातील काही मुलींनी प्रचंड धसका घेतला आहे. महाविद्यालयाचे प्रमुखच असे गैरवर्तन करीत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राचार्यांकडून दुजोरा
याबाबत वस्तुस्थिती पडताळण्यासाठी विद्यमान प्राचार्य एस. डी. बीडगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडल्या प्रकाराला दुजोरा दिला. तसेच याबाबत यापूर्वीही तोंडी तक्रारी आल्याने त्यांना वसतिगृहाकडे जाऊ न देण्याच्या सूचना वार्डन व सुरक्षा रक्षकाला दिल्या होत्या तसेच त्यांना जेवणही शासकीय निवासस्थानी देण्याबाबत सांगितले होते. परंतु सदरील महाशयाने या सूचनांना धाब्यावर बसवीत वसतिगृहाकडे जाणे सुरूच ठेवले तसेच याबाबत उपसंचालकांशी बोलल्याचे सांगून आपण बाहेरगावी आहोत, परतल्यानंतर याबाबत लेखी अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 
Top