बार्शी- बार्शी आगारातून दररोज या मार्गावर सातत्याने सुरु असलेल्या विना वाहक, विना थांबा बसचे चालक गोरखनाथ जालिंदर गवळी यांच्या इमानदारीमुळे महिला प्रवाशाचे पंचवीस हजार रुपये, सोन्याची अंगठी व महत्वाची कागदपत्रे परत मिळाली.
    गवळी यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन बार्शी आगार व्यवस्थापक एस.एम.कदम यांनी चालक गवळी यांचा सत्कार केला. यावेळी वाहतूक नियंत्रक जससिंह परदेशी, वाहतूक निरीक्षक योगेश कुलकर्णी, वरिष्ठ वाहतूक निरीक्षक विजयकुमार हांडे, महिला प्रवासी सुनिता जाधव आदी उपस्थित होते.
   
    शनिवारी दि. २३ रोजी सदरची घटना घडली. दुपारी साडेतीनच्या दरम्यान सोलापूरहून बार्शीकडे वाहन निज्ञाले. बार्शीत दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाहन बार्शीत आले. वाहनातील सर्व प्रवाशी उतरल्यानंतर चालकाची त्या दिवसाची शेवटची फेरी असल्याने नियमाप्रमाणे वाहनात डिझेल भरुन वाहन चालकाने बार्शी आगारात जमा केले. घराकडे निघतांना आपल्या दुचाकी वाहनाची चावी बसमध्ये विसरल्याने चालक बसमध्ये चावी घेण्यासाठी गेल्यावर प्रवाशी सीटवर अज्ञात महिलेची पर्स विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदरची पर्स घेऊन त्यांनी त्यांचे वरिष्ठ वाहतूक नियंत्रक माणिक सांगळे यांना कोणाची तरी पर्स वाहनात विसरल्याचे सांगून घराकडे जात असल्याचे सांगीतले. यावेळी सांगळे यांनी सदरची पर्स उघडून तरी बघा कोणाचे संदर्भ वगैरे काही आहे का असे म्हणत गवळी यांना सदरची पर्स उघडून पाहण्यास सांगीतले. सदरच्या पर्समध्ये रोख रक्कम, सोन्याची अंगठी तसेच महत्वाची कागदपत्रे असल्याचे दिसून आले. काही वेळानंतर ज्यांची पर्स त्या वाहनात विसरली त्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिता जाधव आपल्या सहकार्‍यांसमवेत धावतच बस आगाराकडे आल्या होत्या. सदरची पर्स त्यांची असल्याची ओळख पटल्याबरोबर त्यांना त्याचा ताबा देण्यात आला. यावेळी सुनिता जाधव यांनी चालकाच्या इमानदारीचे बक्षीस म्हणून काही रक्कम देण्याचा प्रयत्न केला परंतु चालक गवळी यांनी कोणतेही बक्षीस घेणार नाही आपण आपले कर्तव्य केले आहे. आपण कोणत्याही अपेक्षेने सदरचे काम केले नसल्याचे सांगत आपण असे केल्यास त्या गोष्टीचा कोणीही आदर्श घेणार नाही असे विचार व्यक्त केले. बसचालक गवळी यांच्या कार्याची दळल घेऊन आगार व्यवस्थापक एस.एम.कदम यांनी यांनी बार्शी आगारतर्फे पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी शंकर मधुकर फुरडे यांनीही एका प्रवाशाचा विसरलेला भ्रमणध्वनी परत दिल्याचे सांगीतले.
 
Top