उस्मानाबाद -  महाराष्ट्र  राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उस्मानाबाद जिल्हा व्यवस्थापन कक्षामार्फत प्रकाशित उमेद-संवाद या मासिकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. अभियानाची कार्यपद्धती, उद्दिष्ट्ये, जिल्ह्यातील अंमलबजावणी याची माहिती या मासिकातून करुन दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या संकल्पनेतून  हे मासिक तयार करण्यात आले आहे.
     नुकतीच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली. त्यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत या उमेद-संवादच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे,  प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, वाशी व उमरगा पंचायत समित्यांचे सभापती यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
           ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठीचे महत्वपूर्ण अभियान आहे. या मासिकामधून त्याचे निश्चितच प्रतिबिंब पडेल आणि या मासिकातील दर्जेदार  माहितीचा उपयोग इतरांनाही होईल, अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
दारिद्र्यनिर्मूलन कार्यक्रम आणि जाणीव जागृती कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यास उमेद मासिकाचा उपयोग होईल, अशी भावना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी व्यक्त केली. जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. केशव सांगळे यांनी या मासिक बातमीपत्राबाबतची संकल्पना यावेळी स्पष्ट केली
 
Top