मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून वाटाघाटीही झाल्या. परंतु या वाटाघाटीसंबंधी काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा करण्याऐवजी ऐनवेळी चर्चा करण्याचे टाळले. आम्ही आतापर्यंत वाट पाहात होतो. परंतु काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या १५ वर्षांची आघाडीही तुटली आहे.
  आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने काल ११८ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार घोषित केले. त्यातील काही जागांवर वाटाघाटी सुरू होत्या. त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज बैठक घेऊन आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचारविनिमय सुरू केला. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आता चर्चेची वेळ निघून गेल्याचे सांगत स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे सांगितले. त्यामुळे आता आघाडीतील फूट अटळ मानली जात होती.
या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली आणि या बैठकीत काँग्रेससोबत राहायचे की स्वतंत्र लढायचे, यावर चर्चा करण्यात आली. याबरोबरच उमेदवारांची यादी निश्चित करण्यासंबंधीही विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर रात्री ८ वाजता पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याचे जाहीर करण्यात आले. या पत्रकार परिषदेला प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा
काँग्रेससोबतची आघाडी तोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर यांची भेट घेतली आणि सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे राष्ट्रवादीने आघाडी तोडल्यानंतर सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली. यातून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे.
-राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने अवास्तव मागण्या केल्या. विशेष म्हणजे भाजपापाठोपाठ त्यांनी आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला. पण जनता खुळी नाही.माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
निम्म्या जागा आणि अर्धा काळ मुख्यमंत्रिपद वाटून मागितले होते. परंतु काँग्रेस नेत्यांनी आमच्याशी संपर्क केला नाही किंवा प्रस्तावही दिला नाही. महिन्याचा काळ फुकट घालवला.प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते

 
Top