मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन या दिवंगत नेत्यांनी २५ वर्षांपूर्वी केलेल्या युतीला अखेर आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर भाजपने मुठमाती दिली. वाढीव जागा देण्याची मागणी शिवसेनेने धुडकावून लावल्याने व तब्बल आठवडाभर माथेफोड करूनही मार्ग न निघाल्याने अखेर आज भाजपने शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेससोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी युती आणि आघाडी तुटल्याने राज्यात आज राजकीय भूकंप झाला असून अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली आहे. राज्यात युती गेल्या २५ वर्षांपासून, तर आघाडी १५ वर्षांपासून होती. या युती आणि आघाडीला अखेर एकाचवेळी तडा गेला आहे.
दरम्यान, महायुतीतील महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामने भाजपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असून रामदास आठवले यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपने स्वबळावर बहुमत मिळविल्यापासून शिवसेना-भाजप युतीत रस्सीखेच सुरू होती. गेली अनेक वर्षे उराशी बाळगलेले शत प्रतिशत भाजपचे स्वप्न साकार करण्याची हीच संधी आहे, हे ओळखून भाजपने तयारी सुरू केली व जास्त जागांवर दावा सांगून शिवसेनेभोवती दोर आवळायला सुरुवात केली होती. शिवसेनेने आपल्या हिश्शातील १९ जागा भाजप व मित्र पक्षाला सोडण्याची तयारी दर्शविली; पण भाजपने आपल्याही जागा वाढवून देण्याची मागणी लावून धरली; पण शिवसेना किमान १५० जागा लढवणारच, अशी भूमिका घेतली. हा तिढा सोडविण्यासाठी गेला आठवडाभर चर्चा सुरू होती; पण दोन्ही पक्षांनी ठाम भूमिका घेतल्याने अनेक प्रस्ताव पुढे येऊनही तोडगा निघू शकला नाही. अखेर केंद्रीय नेतृत्वाकडून अनुमती घेऊन भाजपच्या कोअर कमेटीत शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती मोडित काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रासपचे महादेव जानकर यांनी सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना वगळून महायुती करण्याची घोषणा केली.
२५ वर्षांपूर्वी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपनेते प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना-भाजप युतीची स्थापना केली होती. आजवरच्या वाटचालीत अनेक राजकीय चढउतार येऊनही युती अभेद्य राहिली; पण या वेळी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे सगळी चर्चा एकाच आकड्याभोवती फिरत राहिली त्यामुळे युती तोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला. लोकसभेपासून आमच्या बरोबर असलेल्या मित्र पक्षांना सोबत ठेवून त्यांचा सन्मान राहील, आशा जागा सोडण्याचा आमचा प्रयत्न होता; पण शिवसेना एकाच आकड्यावर ठाम राहिली. जे काही फॉम्र्युले पुढे आले, त्यात एक तर त्यांच्या जागा कमी होत होत्या किंवा आमच्या जागा कमी होत होत्या. त्यामुळे मार्ग निघत नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस राहिले असल्याने अखेर हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.
 
Top