उस्मानाबाद -  शेतक-याचे आयुष्य बदलण्यात कृषी सहायकांचे योगदान महत्वाचे आहे. शेतकरी गट स्थापनेचे महत्व शेतकऱ्यांना पटवून द्या आणि येत्या 10 दिवसात ते उद्दिष्य पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. येथील जिल्हा  परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित शेतकरी गटस्थापना आढावा बैठकीत ते बोलत होते. 
    यावेळी ‍अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही. डी. लोखंडे, उपसंचालक एस. आर. चोले, कृषी विभागाचे उपविभागीय  कृषी अधिकारी व्ही. बी. बिरादार, आर. टी. जाधव, तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञ आदी उपस्थीत होते. 
    डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की, उमरगा तालुक्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्या तालुक्याचा आदर्श इतर तालुक्याने घेवून कार्य करावे, उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा राज्यस्तरावर सत्कार करुन त्यांना ग्रीनकार्ड देण्यात येईल.‍शिवाय  एक वेतनवाढ देण्यात येईल, पण  जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा, कामचूकारपणा  करतील, अशाविरुध्द कठोर कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला.  
    डॉ. नारनवरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, कृषी क्षेत्रात तरुण महिला कृषी सेवक, सहायकांनी आपल्या कार्याची चुणूक  दाखविली आहे. तेव्हा इतर कर्मचाऱ्यांनी  आपणावर सोपविलेले  काम जबाबदारीने उत्तमरीत्या वेळेत पूर्ण करण्यात यावीत. शेतकरी गटस्थापनेचे काम भूम, परंडा, वाशी, कळंब या तालुक्याचे  काम असमाधानकारक केल्याने त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.      यावेळी जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केलेल्या  कृषी सहायक, कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आला.  *



 
Top