उस्मानाबाद - पत्रकार संघाच्या उपक्रमामुळे गणेश मंडळांमध्ये संचारलेला उत्साह समाजोपयोगी आहे. या उपक्रमातून गणेश मंडळांनी पुढील काळात प्रशासनाच्या मदतीने नवनवीन योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी पत्रकार संघ आणि गणेश मंडळांकडून प्रशासनाला सहकार्य अपेक्षित आहे. उत्सवाच्या पाठीमागे ही सामाजिक भूमिका निर्माण करण्यात पत्रकार संघाने यश मिळविले आहे. ही विसर्जन मिरवणूक नव्हे, तर विधायक सामाजिक चळवळ असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
      उस्‍मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने शिस्तबध्द श्रीगणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. नारनवरे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, नगराध्यक्ष सुनिल काकडे, पालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा, शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, पत्रकार सुहास सरदेशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. १० दिवसांच्या कालावधीत मंडळांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांना बळ देण्यासाठी पत्रकारांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. त्यामुळे गणेश मंडळ खर्‍या अर्थाने सामाजिक बांधिलकीतून लोकोपयोगी उपक्रम मोठ्या संख्येने राबवित आहे. पुढील काळात हे उपक्रम केवळ १० दिवसांपुरते न राहता, सलग वर्षभर राबवावेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनही आपल्याला सहकार्य करेल, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी, मंडळांनी विसर्जन मिरवणूक स्पर्धेत नोंदविलेल्या सहभागाबाबत त्यांचे अभिनंदन केले. मिरवणूक स्पर्धेमुळे पोलीस प्रशासनाला शांतता व सामाजिक स्थैर्य राखण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. सुमन रावत यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांना शुभेच्छा देवून त्यांच्या कलागुणांचे कौतूक केले. अशा कलागुणांसाठी पत्रकारांनी निर्माण केलेले व्यासपीठ स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनीही यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या गणेश मंडळांना शुभेच्छा दिल्या. आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनीही पत्रकार संघाच्या व्यासपीठावरून गणेश मंडळांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील पारितोषिकांचे प्रायोजक संजय मंत्री, डॉ. सचिन देशमुख, डॉ. दिग्गज दापके, राज ढवळे, गुणवंत आडसूळ, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. विसर्जन मिरवणूक स्पर्धेत शहरातील २१ गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. ढोल पथक, लेझीम पथक, झांझ पथक आणि पथनाट्य कलावंत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे निमंत्रक रविंद्र केसकर यांनी, सूत्रसंचालन उपाध्यक्ष देविदास पाठक, सचिव विशाल सोनटक्के, सयाजी शेळके यांनी केले. तर आभार पत्रकार संघाचे कायम निमंत्रक अनंत आडसूळ यांनी मानले. लाईव्ह प्रक्षेपणामुळे गणेश मंडळांचा जल्लोष
महिलांनीही लुटला विसर्जन मिरवणुकीचा आनंद
पत्रकार संघाने यंदा मोठ्या पडद्यावर मिरवणूक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केल्यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, पारंपारिक वाद्याचा ठेका, गुलाल आणि फुलांची मुक्त उधळण यामुळे सारे वातावरणच भारुन गेले होते. दरवर्षी गर्दीमुळे महिला व लहान मुलांना विसर्जन मिरवणुकीचा आनंद मिळत नव्हता. मोठ्या पडद्यावर सुरु असलेल्या प्रक्षेपणामुळे विसर्जन मार्ग अक्षरश: गर्दीने फुलून गेला होता. शहरातील अनेक महिलांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतूक केले. लाईव्ह प्रक्षेपणामुळे आम्हाला हा आनंद प्रथमच अनुभवता आला असल्याचेही अनेकांनी सांगितले.
 
Top