बार्शी -  शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
    संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड सोलापूर जिल्हयातील विविध विभागाच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक न केल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असे म्हटले आहे.
      या निवेदनामध्ये जिल्हातील केवळ ५ साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतलेले आहेत. इतर कारखान्यांचे गाळप हे विनापरवानगीने सुरु आहे. अशा कारखान्यांना दंड व शिक्षा करावी तसेच शेतकर्‍यांच्या ऊसाला किमान ३५००/- रुपयांची उचल द्यावी. दुध भुकटी निर्यात करण्यासाठी अनुदान देऊन दुधाच्या दरात प्रति लिटर १० रुपयांनी वाढ करावी. सर्व तालुका कृषी कार्यालयांनी वेगवेगळया योजनांमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करुन ग्रामसभेसमोर जाहीर करावे.
   
    डॉ. सुभाष माने व डी. डी. आर. लावंड यांनी शेतकर्‍यांना आश्वासने देऊनही जिल्हयातील मार्केट कमिटीच्या वतीने अद्यापपर्यंत इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविण्यात आले नाहीत. आडत व विविध करांची जादा रक्कम शेतकर्‍यांकडून वसूल करण्यात येते ती त्वरीत बंद करवी. वीज वितरण कंपनीकडेच आम्हा शेतकर्‍यांचे पैसे येणे बाकी असल्याची जनहित याचिका न्यायालयात असल्याने जिल्हयातील शेतकर्‍यांची वीज जोडणी खंडित करु नये. वीज बीलांतून होणारी आर्थिक पिळवणूक त्वरीत थांबवावी. ग्रामीण भागातील लोडशेडिंग त्वरीत थांबवावे., कांदयावरील निर्यांतशुल्क रद्द करावे. ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, मका यासारख्या सर्वच पीकांच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ करुन त्यावरील निर्यातबंदी उठवावी आदी मागण्यांची पूर्तता १० दिवसांच्या आत न झाल्यास संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको व चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा युवा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष औदुंबर मोरे, सिध्देश्वर हेंबाडे, बाळासाहेब वाळके, हरिदास थिटे, चंद्रशेखर माळी, हनुमंत चौगुले, सुनिल बिराजदार, सचिन आगलावे, आनंद भोटे, उध्दव गवळी, नाना गवळी, संभाजी पवार, शौकतभाई आदी उपस्थित होते.
 
Top