पुणे - जर्किनचा हट्ट न पुरवल्याने एका १० वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. घरात कुणीही नसताना या मुलाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत स्वत:चे जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. 

      आदित्य पिसाळ असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. धनकवडी परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक सुनील पिसाळ यांचा तो मुलगा होता. सुनील यांच्या बहिणीचा रविवारी वाढदिवस होता. त्यासाठी हॉटेलमध्ये ठेवलेल्या पार्टीला घरातील सगळेच जाणार होते. यावेळी आदित्यने आईकडे जर्किनसाठी हट्ट धरला. मला आत्ताच्या आत्ता जर्किन हवे नाहीतर मी तुमच्यासोबत येणार नाही, असे त्याने सांगितले. त्यावर आता तुला स्वेटर घेऊ, असे सांगून आईने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदित्यने जर्किनचा हट्ट काही सोडला नाही. आईवर तो रागावलाही. आदित्य काही केल्या ऐकत नसल्याने शेवटी त्याला एकटेच घरी ठेऊन बाकी सगळेजण हॉटेलमध्ये गेले. त्याचवेळी आदित्यने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. 

  रात्री सव्वा दहाच्या सुमारास कॉम्प्युटरच्या टेबलवर उभे राहून त्याने पंख्याला ओढणी बांधली आणि ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, अवघ्या १० वर्षाच्या मुलाने आत्महत्या करण्याची ही घटना सर्वांनाच धक्का दोणारी असून मुलांच्या हट्टीपणाचा मुद्दा अधिकच गडद बनला आहे.  

 
Top