उस्मानाबाद :- अडचणीत असणा-या शेतक-यांच्या मदतीसाठी प्रशासनाला सहकार्य म्हणून अनेक समाजसेवी संस्था पुढाकार घेतात आणि शेतक-यांच्या प्रती त्यांची आपुलकी व्यक्त करतात, ही अभिमानाची बाब आहे. प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना यामुळे सकारात्मक बळ मिळेल, अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आरणी, ता. उस्मानाबाद येथे बोलताना व्यक्त केली.
         आरणी येथे महेश सेवा समिती, डोंबिवली आणि क्रीड सोसायटी, कल्याण यांनी गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत म्हणून वीस सिमेंटचे हाळ (हौद) जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी उपलब्ध करुन दिले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते ते गावक-यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तहसीलदार सुभाष काकडे, महेश सेवा समितीचे अध्यक्ष प्रताप माने, क्रीड सोसायटीचे अध्यक्ष नामदेव पाटील, तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव, नायब तहसीलदार राजेश जाधव, मंडळ कृषी अधिकारी ए.पी.चिक्षे, श्री. वाघ, श्री. सस्ते आदींची यावेळी उपस्थिती होती.
         कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीला डगमगणार नाही आणि आत्महत्या करणार नाही, अशी शपथ घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात शेतकरी गट स्थापनेचे प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते यावेळी सिमेंटचे पाण्याचे हाळ गावक-यांकडे सुपूर्त करण्यात आले.
         यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातीलच काही तरुण शेतकरी एकत्र येऊन शेतीत नवे प्रयोग करीत आहेत. तसेच जिल्हा प्रशासनही शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना एकत्रितरित्या देऊन एकात्मिक विकासासाठी प्रयत्नशील आहे. पाच महिन्यांपूर्वी केवळ पाचशे शेतकरी गट जिल्ह्यात होते. आज ती संख्या पंधरा हजार इतकी झाली आहे. शेतकरी एकत्र आले तर विविध योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ शकते, हे लक्षात घेऊन यापुढे शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती, जमीन, पाणी उपलब्धता, हवामान आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
      शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता गरजेचा बनलेला आहे. एकेकट्या शेतक-यांसाठी तंत्रज्ञान काहीसे महागडे ठरत असले तरी शेतकरी गटाच्या माध्यमातून ते कमी खर्चाचे आणि दुप्पट फायद्याचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. कृषी विभाग आणि कृषी संलग्न विभागांच्या योजना एकत्रितपणे राबविण्यासाठी शेतकरी गट स्थापन करुन शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
           यावेळी बिराजदार यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन केले. गटशेती आणि कृषी योजना याबाबत शाहीर राणा जोगदंड यांनी जागृतीपर कार्यक्रम सादर केला.
 
Top