उस्मानाबाद : सेवा देणारे सगळेच ग्राहक संरक्षण कायद्याच्या व्याख्येत येतात. त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देणे आणि कामाचा दर्जा उंचावणे हेच महत्वाचे आहे. नागरिकांना सेवेतून संतुष्ट करणे हेच अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
         येथील महसूल भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या प्रभारी अध्यक्ष विद्युलता दलभंजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए.एम. देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव व श्री. रामदासी यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
         यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, आज जगात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. ग्राहकांची व्याख्या बदलतेय. अशावेळी आपण ज्या सेवा उपलब्ध करुन देतो, त्या वेळेत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सेवा देणारे सगळेच राईट टू सर्व्हिस या कायद्यांतर्गत आगामी काळात येणार आहेत. त्यामुळे वेळेत सेवा देणे हे प्रत्येकासाठी महत्वाचे राहणार आहे.  ग्राहक मंचाकडे जाणाऱ्या तक्रारी कमी होतील, तो खरा सुदिन असेल, असे सांगून त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा श्रीमती दलभंजन यांनी आपण प्रत्येकजण हा ग्राहक असतो, असे सांगितले. बाजारपेठेतून कोणतीही वस्तू खरेदी करताना पावतीचा आग्रह धरा, असे सांगून ग्राहक मंच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
      यावेळी प्रमुख वक्ते डॉ. देशमुख यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रवास सांगितला. ग्राहक हक्क व ग्राहक संरक्षण चळवळ ख-या अर्थाने बिंदूमाधव जोशी यांनी वाढविली. केंद्र शासनाने 24 डिसेंबर, 1986 रोजी ग्राहक संरक्षण हक्काला कायद्याचे स्वरुप दिले. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहक ही संकल्पना आता बदलत असल्याने ग्राहक चळवळही व्यापक बनावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
         प्रास्ताविकात श्री. लाटकर यांनी ग्राहक दिन आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तहसीलदार काकडे, नायब तहसीलदार जाधव, जे. व्ही. कदम, श्रीमती बंगले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना दुय्यम शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. व्यास यांनी केले तर राजेश जाधव यांनी आभार मानले. जिल्हा पुरवठा कार्यालय, तहसील कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
 
Top