बार्शी  (मल्लिकार्जुन धारुरकर) आमच्याकडील रोपे घ्या याला भरघोस उत्पादने मिळतात अशा प्रकारच्या जाहीराती करुन काही जणांनी उद्योग सुरु केले आहेत. काही शेतकर्‍यांना त्याचा उपयोग झाला परंतु बहुतांश शेतकर्‍यांना त्यांचे वाईट अनुभव आल्याने अशा प्रकारच्या जाहीरातींची भिती वा
टत आहे. वाणेवाडी येथील शेतकर्‍याने मात्र प्रामाणिक प्रयोग करुन स्वत:चे सिताफळाचे कलम स्वत: विकसीत करुन शेतकर्‍यांना मोफत मार्गदर्शन सुरु केले आहे. त्यांनी घेतलेल्या उत्पादनानंतर अनेक शेतकरी भेटी देण्यासाठी येऊन कौतुक करतांना दिसत आहेत.
दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकर्‍यांनी आहे त्या परिस्थितीला तोंड देत नवनवीन प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. वाणेवाडी (ता.बार्शी) येथील अनंता महादेव गरदडे या शेतकर्‍याने विकसीत केलेल्या सीताफळाच्या झाडांना एकरी ४ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळत असल्याने इतर शेतकर्‍यांना यातून प्रेरणा मिळत आहे. कृषि सहाय्यक गणेश पाटील यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले आहे.
बाळानगरी जातीच्या सिताफळाच्या रोपांवर पहिल्या वर्षी पेन्सिलच्या आकाराची फांदी झाल्यानंतर पाचर कलम करुन विकसीत केलेल्या गोल्डन जातीच्या सिताफळास चविष्ठ लहान फळ येते तर हनुमान जातीच्या सिताफळाच्या मोठ्या आकारातील फळ तयार होते. १५ फुटांच्या अंतरावर रोपांची लागवड करण्यात येते. लागवडीनंतर या रोपांना तीन वर्षानंतर उत्पादन सुरु होते. सिताफळाच्या झाडांमध्ये दोन झाडांच्यामध्ये शेवगा, सोयाबीन आदी आंतरपिक घेतल्यास त्याचेही स्वतंत्र उत्पन्न मिळू शकते, जनावरांची भिती नसल्याने या पिकासाठी राखण करण्याची आवश्यकता पडत नाही. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांची गरज पडत नाही. पाण्याचीही जास्त गरज नसल्याने शेतकर्‍यांना जास्त श्रमाची गरज नाही. रासायनिक खतांचा वापर नसल्याने तसेच त्याची टिकवणक्षमता चांगली असल्याने मार्केटमध्ये त्याला चांगल्या प्रकारची मागणी असून सद्यस्थितीत उच्चांकी १८० रुपये प्रतिकिलोस दर देण्यात येतो. सरासरी पाहिल्यास स्टँडर्ड आकाराची १० किलो, दुय्यम आकाराची ८ किलो, कमी दर्जाची २ किलो अशा २० किलोपर्यंत फळांचे उत्पादन तर बाजारातील किंमत पाहता एका झाडापासून १५०० रुपये प्रतिहंगामास उत्पन्न मिळते. गरदडे यांनी त्यांच्या शेतामध्ये २० एकर गोल्डन जातीचे सिताफळ, हनुमान जातीचे १० एकर बाळानगरी ४ एकर क्षेत्रात लागवड केली आहे. ड्रीप केल्याने त्यांना गरजेच्या वेळी पाणी देतांनाही पाण्याचा अपव्यय होत नाही. खर्चाचा विचार करता पहिल्या वर्षी मातृवृक्ष गावठी रोपास प्रत्येकी १० रुपये, कलम करण्यासाठी ५ रुपये, ६० सें.मी.बाय ६० सें.मी.खड्डा घेण्यासठी एकरी ५ हजार, ठिबक करण्यासाठी एकरी १५ हजार, आंतरमशागतीसाठी २ हजार, कुळवणीसाठी २ हजार, ४ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखतासाठी २० हजार या प्रमाणे जवळपास ५० हजार रुपये प्रतिएकरास खर्च येतो. दुसर्‍या वर्षी आंतरमशागत व शेणखताचा सुमारे २२ हजार रुपये खर्च तिसर्‍या वर्षी जवळपास २२ हजारांचा खर्च तर या वर्षी उत्पादनासही सुरुवात होते. यावेळी ६ ते १२ फळांचे उत्पादन प्रत्येक रोपास, सुमारे ३ किलो फळ, ५०० रुपये प्रति झाडांना उत्पन्न मिळते. चौथ्या वर्षीपासून १५०० रुपये प्रतिझाडाचे उत्पन्न सुरु होते. बाजारभावाचा विचार करता एकरी ४ लाख ८० हजारांचे उत्पादन तर लागवड, बॉक्स पॅकींग, काढणी, वाहतूक, प्रतवारी आदी खर्च वजा जाता ३ लाख ९२ हजार ते ४ लाखापर्यंत प्रतिएकरी उत्पादन मिळते. फळांच्या सिझन नंतर पानगळ होते अथवा काही वेळा पाने काढून टाकावी लागतात व शेंड्याची छाटणी करावी लागते. याकरिता एकरी २ हजारांपर्यंत खर्च लागतो. खाली पडलेल्या पानांचा उपयोग सेंद्रीय खत उवा मल्चिंगसाठी करता येतो. फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी टाकाऊ वस्तूच्या रिकाम्या प्लास्टीक डब्यापासून काम गंध सापळा तयार करता येतो. उत्पादन सुरु झाल्यानंतर १५ वर्षांपर्यंत त्याचे चांगले उत्पन्न मिळू शकते.

शासनाच्या कृषि विभागाकडून गरदडे यांना हेक्टरी ३२ हजार ९३० प्रमाणे अनुदान दिले आहे. कृषि विभागाचे गणेश पाटील यांनी गरदडे व इतर शेतकर्‍यांना यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. विदर्भ 
मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी सिताफळाची शेती एक वरदान होऊ शकते. 

 
Top