बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) : आनंदयात्री प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची उंची वाढत आहे. कला अभिनयाच्या माध्यमातून कलाकारांना न्याय देण्याचा त्यांचा उद्देश सफल झाला आहे यावर न थांबता त्यांनी यापुढे बाल नाट्य स्पर्धांचे आयोजन करुन बाल कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मुलांच्या पालकांनाही आपल्या पाल्याची दर्जेदार गुणवत्ता वाढत असल्याचे पाहून आनंद होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
बार्शीतील आनंदयात्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजा माने, सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, नगराध्यक्ष रमेश पाटील, उपनगराध्यक्ष अरुणा परांजपे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश अक्कलकोटे, परिक्षक दिलीप घारे, ज्ञानेश मुळे, काकासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, एकांकिका ही केवळ करमणूक नसून यातून समाजातील अनेक जिवंत प्रश्‍न रेखाटण्याचे व त्यातून मार्ग काढण्याचे व्यासपीठ आहे. कलाकारांसाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी राजाश्रयाची आवश्यकता लागते त्याशिवाय अशा प्रकारचे उपक्रम घेता येत नाहीत. अकलूजमध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांतून अनेक कलाकार, ईव्हेंट मेकिंगचे प्रशिक्षण घेऊन अनेकांनी आपले वेगळे व्यवसाय सुरु केले. यातून वेगळ्या प्रकारची इनस्ड्रीज तयार झाली. यापुढे आणखी चागले दिवस येतील व प्रेक्षकांनाही यातून चांगली करमणूक व आनंद मिळेल.
ज्येष्ठ पत्रकार राजा माने म्हणाले, बार्शीचे नाव अनेक बाबतीत पुढे आहे बार्शीच्या इतिहासात आनंदयात्री प्रतिष्ठानच्या नावाची भर पडली आहे. अष्टपैलू, कलाप्रेमी, संवेदनशील आमदार दिलीप सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त मागील तीन वर्षांपासून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बचर्शीची नाट्यचळवळ व नाट्यपरंपराही मोठी असून आनंदयात्री स्पर्धेतून नाव मिळविणार्‍या कलाकारांना हा मानाचा तुरा आहे. बार्शीत बाल नाट्य स्पर्धांसारखे उपक्रम सुरु करण्याबरोबर सोलापूर विद्यापीठातून नाट्य शास्त्र, फिल्म मेकिंग कोर्स सुरु करण्याचे प्रयत्न व्हावेत. कला ही जन्मजात असावी लागते हे खरे असले तरी बदलत्या तंत्रज्ञानानुसार लोकांची मागणीही लक्षात घेणे गरजेचे आहे. नागनाथ मंजूळे सारख्या ग्रामीण कलाकाराने आज आंतराष्ट्रीय महोत्सवांत नाव मिळविले आहे. ग्रामीण कलाकारांना आणखी जास्त प्रोत्साहन मिळावे हाच आनंदयात्री प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे.
 
Top