बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) -: बेकायदा धंद्याविरोधात बातमी दिल्याचा राग मनात धरुन अवैध धंदे करणार्‍या गुंडाकडून जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील प्रविण तुपसुंदर या पत्रकारास गंभीर जखमी करण्यात आले. जिल्ह्यातील विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. बार्शीतील पत्रकारांनी निषेधासह हल्ल्याचा तपास करण्याबाबतचे निवेदन बार्शीतील पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांना दिले आहे.
पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांना निवेदन देतांना चंद्रकांत करडे, गोरक्षनाथ यादव, भैरवनाथ चौधरी, सचिन अपसिंगकर, गणेश घोलप, प्रशांत काळे, संजय बारबोले, सुदर्शन हांडे, मल्लिकार्जुन धारुरकर, विनोद ननवरे, सचिन वायकुळे आदी पत्रकार उपस्थित होते.
बुधवारी सकाळी टेंभूर्णीतील कुर्डूवाडी चौकात प्रविण तुपसुंदर यांना आनंद विलास तांदळे (वय ३१), विकास विलास तांदळे (वय १९) यांनी लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर इंदापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. आनंद तांदळे याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती टेंभूर्णी पोलिसांकडून मिळत आहे. त्याच्याविरोधात हद्दपारीची प्रक्रियाही यापूर्वी सुरु झाली असून शासकिय कर्मचार्‍यांनाही त्याच्याकडून मारहाण झाली आहे. अवैध व्यावसायिकांकडून पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंद करण्याचा कायदा संमत होण्याची मागणी जोर धरत आहे.
 
Top