बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) बाळाची भूक जिला कळत नाही ती आई डुप्लीकेट आहे. नुकताच जन्म घेतलेल्या मुलाजवळ दूधाची बाटली ठेवून मुलाला वार्‍यावर सोडणार्‍या आईला आई म्हणता येत नाही. मुलगा रडल्याबरोबर त्याला आपल्या जवळ घेऊन दूध पाजणारी वात्सल्यस्वरुपच आई असते. काल्याचा प्रसाद सेवन करणे हा अमृतयोग आहे, हृदयरुपी भांडे नियमित स्वच्छ केल्याशिवाय पवित्र अमृताचे कण त्यामध्ये ठेवणे उचीत नाही. असे प्रतिपादन ह.भ.प.भास्कर मांजरे महाराज यांनी केले.
बार्शीतील यशवंतनगर येथे शिवपुत्र गणेश प्रतिष्ठानच्या वतीने गणेश जयंतीनमितन्त आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तन प्रसंगी ते बोलत हाते. यावेळी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक मुन्ना शेटे, नगरसेवक नाना मांगडे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांजरे महाराज म्हणाले, भगवंताचे मनन, चिंतन, काकडा, भजन आदी मार्गाने सूक्ष्म देहाची तृप्ती होते. हरिनामाचा काला, जीव शिव ऐक्याचा काला, दहिभाताचा काला, असे काल्याचे तीन प्रकार आहेत. काला सेवन करतांना अत्यंत सावकाश करावा. सासरी गेलेली मुलगी माहेरी आल्यानंतर आईला ज्यावेळी मुलगी समोर दिसते त्यावेळी ती जशी नि:शब्द होते व शांती प्राप्त होते त्याप्रमाणे काल्याचे महत्व आहे. देवापेक्षा देवाचे नाम श्रेष्ठ आहे हे रामसेतूप्रसंगी दगडावरील राम नाम टाकलेले दगड तरंगल्याच्या प्रसंगावरुन स्पष्ट होते. काल्याच्या किर्तन प्रसंगी केवळ श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन आढळते. गोकुळातील श्रीकृष्णाच्या लीलया, मथुरेतील व द्वारकेतील अशा तीन प्रकारच्या लीलयांचे वर्णन केले जाते. एखादी गोष्ट करणे सोपी गोष्ट आहे परंतु तीच क्रीया दररोज नित्यनेमाणे करेण व त्याचा नियम सांभाळणे ही क्रीया भक्ती तत्वापेक्षा अवघड आहे. लहान मुलांवर चांगले संस्कार रकण्यासाठी व त्याला चांगला मनुष्य बनविण्यासाठी वारकरी शिक्षण मंडळ काम करत आहे. केवळ प्रापंचिक अडचणीसाठी अथवा कोणालातरी रोजगार उपलब्ध होण्यासाठी या शिक्षण संस्थेची निर्मिती नाही. भक्तीच्या सर्वोत्तम स्थानाचे शिक्षण देण्यासाठी वारकरी शिक्षण मंडळ काम करते. आजच्या शाळेच दफ्तराचे ओझे मोठे झाले आहे. आई झाल्याशिवाय आई कळत नाही, रामाला आचरणात आणावे, कष्णाचे उच्चारात आणावे.

 
Top