उस्मानाबाद -  बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बचत गटांनी बनविलेल्या विविध वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाच्या आद्या महोत्सवास गुरुवारी सुरुवात झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनाचे मार्केटींग, क्षमताबांधणी व कौशल्यवृद्धी आणि बचत गटांसाठी अर्थसाह्य याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
शहर पोलीस स्टेशनच्या समोरील दी उस्मानाबाद क्लब येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित आद्या महोत्सवाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज
करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. कुलदीप (धीरज) पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे सभापती सर्वश्री दत्तात्रय मोहिते, बाबुराव राठोड, हरिश डावरे, लता पवार, पंचायत समिती सभापती सर्वश्री असिफ मुल्ला, छायाताई वाघमारे, प्रेमलता लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रुपाली सातपुते यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. स्वित्झर्लंडच्या पेट्रो कॉलर आणि सॅम्युअल या महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
यावेळी आद्या-2014-15 या स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते बचत गटांना करण्यात आले. 
यावेळी बोलताना श्री. गोरे म्हणाले की, ग्रामविकास विभागामार्फत बचत गटांना सक्षम करण्याचे उपक्रम सुरु आहेत. मात्र, या प्रक्रियेला बळ देण्याची गरज आहे.  चूल आणि मुल यातून महिलांनी बाहेर पडून भक्कम आधार उभा करण्याची गरज आहे. त्यासाठी बचत गटांना वेळेवर अर्थसाह्य मिळणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला कोषमधून राज्यासाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
स्वित्झर्लंडच्या पेट्रा यांनी या उपक्रमाबद्दल कौतुकोद्गार काढून शुभेच्छा दिल्या.  आमदार चौगुले यांनी आपल्या भाषणात महिला बचत गटांनी अधिक चांगले काम करावे. पारंपरिक व्यवसायाबरोबरच बाजारपेठेची निकड लक्षात घेऊन व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले. बॅंकांकडून बचत गटांना आर्थिक साह्य देण्याबाबत अडवणूक होत असल्याबाबत जिल्हा स्तरावर त्यासाठी पाठपुरावा करु, मात्र बचत गटांनी ज्या कारणांसाठी अर्थसाह्य घेतले आहे, त्याच कारणासाठी त्याचा उपयोग करावा आणि वेळेवर कर्ज परतफेड करावी, अशी सूचना केली. 
राज्य व केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्याचा संदर्भ देऊन या योजनेत लोकसहभाग महत्वाचा आहे. महिलांची त्यादृष्टीने विशेष जबाबदारी असल्याचे आमदार चौगुले यांनी सांगितले. राज्यात महिला आरोग्य अभियानाची आज सुरुवात झाली. त्यामुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत. मात्र, त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्याचे आ. चौगुले यांनी सांगितले. जि. प. अध्यक्ष अॅड. पाटील यांनी  महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी महिला एका उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. ही मोठी गोष्ट असल्याचे सांगितले. जिल्ह्यात 1 हजार आठशे नवीन बचत गट आणि जवळपास 4 हजार 200 बचत गट पुनरुज्जीवित करुन सध्या सहा हजार बचत गट कार्यरत करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. आद्या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनात दर्जेदारपणा आणून एक ब्रॅंडनेम विकसित करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रदर्शनात 34 हून अधिक स्टॉल लावण्यात आले असून तेथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन दि. 2 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.

 
Top