बार्शी - अच्छे दिन आऐंगे, सर्वात पुढे महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अशा जाहीरातींचा मारा संपला लोकांनी दिलेली मते आणि मिळालेली सत्ता यांचा अजूनही ताळमेळ बसला नाही आणि सामान्यांच्या अडचणी आहे तशाच राहिल्याचे विदारक चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यातीलच एक जीवंत उदाहरण म्हणजे बार्शी आगारातील धावणार्‍या एसटी बस होय.
भ्रष्टाचारची चर्चा करतांना अनेकजण सहजपणे म्हणतात लोकशाहीपेक्षा इंग्रज बरे होते त्याचप्रमाणे आता भाजपापेक्षा कॉंग्रेसच बरे होते असे म्हणतांना दिसत आहेत. बार्शी बस स्थानकातून ग्रामीण भागात जाणार्‍या अनेक बसची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे. या बसची पत्र्याची आच्छादने वाहन चालतांना हलतांना दिसून येतात. अनेक काचांच्या जागी रिकाम्या फ्रेम आहेत त्यामुळे नैसर्गिक एअरकंडीशन तसेच या वाहनातून प्रवास करणारे प्रवास्यांमध्ये एकच समाधानाची गोष्ट घडते ती म्हणजे खिडकीपाशी बसण्यासाठी कोणी भांडत नाही अथवा जागा धरण्याचा प्रयत्नही करत नाही. पावसाळ्यात तर छत गळत असल्याने बसमध्ये छत्री घेऊनच बसावे लागते. प्रवाशी दारातून आत शिरले काय अथवा खिडकीतून आत शिरले हे सहजासहजी लक्षात येत नाही इतकी दुरावस्था वाहनांची झालेली दिसून येते. बार्शी बस आगारातून उपलब्ध १०८ बसपैकी ३७ वाहनांची अवस्था ही वाहन भंगारात घालण्यासारखी आहे.
यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षीत प्रवास हे विसरा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. आपल्या गावाकडे जाण्यासाठी अनेक खेड्यापाड्यांतील नागरिकांना या वाहनांशिवाय पर्याय नाही इतर खाजगी वाहनांच्या पर्यायाचा विचार करता बसपेक्षा जादा रक्कम आणि चार जण बसण्याच्या जागेवर आठ जणांना बसवून छोट्याश्या वाहनातून सोळा ते वीस जणांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे नाईलाज म्हणून अशा प्रकारच्या वाहनांतून त्यांचा प्रवास सुरु असतो. अशा प्रकारच्या दयनीय अवस्थेतील वाहनांबाबत बसचालक आणि वाहकांनी उद्गार काढल्यास अधिकार्‍यांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देण्यात येते. वाहनांचे चाक पंक्चर झाले तरी त्यांना ते का पंक्चर झाले याचा लेखी खुलासा द्यावा लागतो. अशा प्रकारच्या सतत डगमगणार्‍या वाहनांच्या काचा फुटल्यासही त्यांच्याकडून लेखी घेण्यात येते अनेक प्रसंगी त्यांच्या वेतनातून कपात करण्यात येते. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात अशा प्रकारची वाहने आतून बाहेर काढली जात नाहीत. परंतु सप्ताह संपल्याबरोबर पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेसाठी ही वाहने उपलब्ध होतात. आगारातील अधिकार्‍यांनाही या प्रश्‍नावर वरिष्ठ पातळीवरुन कोणत्याही नवीन वाहनांचा पुरवठा केला जात नाही. एसटी तोट्यात आहे, आहे त्यामध्ये ऍडजस्ट करा, शासनाकडून अनेक कोटी रुपये येणे बाकी आहे अशा प्रकारच्या थापा मारुन कर्मचार्‍यांना कामे करण्याचे बंधन लगावले जाते. अशा प्रकारच्या नादुरुस्त वाहनांना आरटीओ अधिकार्‍यांकडून परवानगी मिळतेच कशी हा देखिल प्रश्‍न यानिमित्ताने समोर येत आहे. ज्या जनतेच्या जोरावर पुढारी आपल्या तुंबड्या भरतात त्या ग्रामीण भागातील सामान्यांच्या व्यथा मात्र तसेच राहिल्याचे विदारक चित्र आजही अनेक प्रसंगी दिसून येत आहे. भ्रष्टाचारी मंडळी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करुन एकर कंडीशन वाहनांचा वापर करतात परंतु सामान्यांचा प्रवास मात्र नादुरुस्त असलेल्या वाहनातून आणि स्वत:चा जीव धोक्यात घालूनच होतो. अशा प्रकारची दयनीय अवस्थेतील वाहने चांगल्या रितीने दुरुस्त अथवा भंगारात घालणे गरजेचे झाले आहे.

 
Top