वैराग (महेश पन्हाळे)  वैराग बसस्थानकामध्ये बार्शी-सोलापूर या एस.टी. बस पुढील चाकाखाली सापडून हळदुगे (ता. बार्शी) येथील वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. वच्छला नरसिं
ह जगताप (वय ७0) असे त्या मृत वृध्द महिलेचे नाव आहे. दरम्यान, या अपघातानंतर बसस्थानकातील एस.टी. चालकांचा निष्काळजीपणा उघड झाला असून प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद वैराग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
      याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार हा वैरागचा आठवडा बाजार दिवस असल्याने वैराग बस स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ होती. दुपारी पाऊणे बारा दरम्यान बस स्थानकामध्येच हळदुगेवरुन आठवडा बाजारासाठी आलेल्या वृध्द वच्छला जगताप या एस.टी. बसमधून उतरून बसस्थानकातून बाजाराकडे निघाले असताना बार्शी-सोलापूर (बस क्र. एम.एच. २0 डी. ९३९७) या एस.टी. ने धडक दिल्याने पुढील चाकाखाली सापडून उजवा पाय चिरडला गेला व गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ रूग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. सदर महिलेच्या पश्‍चात चार मुली असून पतीचा यापूर्वीच निधनानंतर त्या हळदुगे येथे एकट्याच राहत होत्या.

 
Top