उस्मानाबाद -  भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आपले गाव, तालुका आणि जिल्हा जलयुक्त शिवार करण्यासाठी पाझर, साठवण तलाव,  सिमेंट नाला बंधारा, कोल्हापूर बंधाऱ्यांचे गेट दुरुस्ती व नवीन गेट बसविणे, गावातील ओढे-नाले यातील अशा विविध योजनेतील विकासाची कामे प्रस्तावित कामाबरोबरच पूनर्जीवित करण्याचे आवाहन केंद्रीय भुसंसाधन विभागाचे सदस्य डॉ. राजेंद्र सिंह यांनी   केले. 
  भूम येथील पंचायत समिती सभागृहात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.उबाळे, उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. देवकर, जलबिरादरीचे सुनील जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार अरविंद बोळंगे, पंचायत समिती सभापती अण्णा भोगील, गटविकास अधिकारी श्री.उगलमुगले, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद रेड्डी यांची उपस्थिती होती. 
डॉ.सिंह म्हणाले की, जिल्ह्यातील गावांचा जलयुक्त शिवार अभियांनात समावेश  करण्यात आला आहे. त्या-त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने गावातील मतभेद विसरुन आपले गाव जलयुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन तात्काळ कामे सुरु करावीत. पाणी वापरासाठी योग्य नियोजन करुन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाणी आपल्या  जमिनीमध्ये पुनर्भरण करण्याची वेळ आली आहे.  दिवसेदिवस पर्जन्यमान प्रमाण कमी होत आहे. भविष्यात आपली पिढी शेती करण्यासाठी गावात राहावी, यासाठी जलयुक्त गाव करण्याची गरज आहे, असे सांगून पुढे म्हणाले की, शासकीय अनुदानाची अपेक्षा ठेवू नका योजना पूर्नजीवीत करुन प्रशासनाकडून निधी मिळवू शकता, त्यासाठी जिल्ह्यात राजस्थान पॅटर्न राबवून जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
जलसंधारण सचिव श्री.देशमुख म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करावयाची असेल तर लोकसहभागाबरोबरच त्यांच्या सहकार्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकांनी भविष्यकालीन मुलांच्या उन्नतीसाठी पाण्याची देणगी दिली पाहिजे.भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी  विहीर, बोअरचे पुनर्भरण करणे जरुरी आहे. शासकीय योजनेला स्वत:ची योजना म्हणून स्विकारली पाहिजे. पाण्याचे विकेंद्रीकरण होऊ नये, यासाठी पाण्याचे साठे उपलब्ध करुन ठेवावेत. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी पिण्याच्या, जनावरांसाठीच्या पाण्याचा, पिकांसाठीच्या पाण्याचा ताळेबंद करुन समितीमार्फत पाण्याचा योग्य नियोजनात्मक वापर करावा. ब्रिटिश कालीन बंधारे, जुनी स्ट्रक्चर शोधून खोलीकरण व रुंदीकरण करुन गाळ काढावा. या योजनेसाठी जिल्हा वार्षीक योजना, एकामिक पाणलोट आणि आमदार निधीतून निधी मिळण्यासाठी प्रथम लोकसहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
            जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले की, जलयुक्त शिवार करण्यासाठी आपण आपल्या कामात पारदर्शक राहणे आवश्यक आहे. लोकांमध्ये जलयुक्त शिवार करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मान्यवरानी समन्वय समिती करुन जनजागृती करण्याचे आवाहन केले.  
         चर्चासत्राचे प्रास्ताविक जोशी यांनी  तर आभार मेघराज गायकवाड यांनी मानले.   
 
Top