बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) बार्शी नगरपरिषदेच्या सार्वजनिक पिण्याच्या पाईपलाईनवर अतिक्रमण करुन शौचालयांची बांधकामे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत परिसरातील रहिवाशांनी नगरपरिषदेकडे अनेक दिवसांपासून तक्रार करुनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसूत येत आहे.
 बार्शी नगरपरिषदेच्या स्थापनेला दिडशे वर्षे पुर्ण होत असून यंदाचे वर्ष हे मोठ्या योजनापूर्ण विकासाकडे घेऊन जाणारे साजरे करु अशा गप्पा मारतांना अधिकारी व नगरसेवक मात्र  
जनतेच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे जनतेतून बोलले जात  आहे.
याबाबत तक्रार समीरअहमद बशीरअहमद वळसंगकर यांनी दिलेल्या तक्रारीत महेदवी कब्रस्तान शेजारी असलेल्या गट नं.९३३ या सरकारी मालकीच्या जागेत मोठ्या प्रमाणात रहिवासी अतिक्रमण करण्यात आले आहे. यातून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचनाचे प्रारुप विकास योजना (दुसरी सुधारीत) ४० फुटांचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबत आदेशही २००३ साली नगरपरिषदेला देण्यात आले होते. हा रस्ता परंडा रस्ता ते गाडेगाव रस्त्याला जोडणारा असून परिसरातील शेळके प्लॉट, नाईकवाडी प्लॉट, नागणे प्लॉट, गुंड प्लॉट तसेच सर्वे नं.४२२ आदी परिसरातील नागरिकांच्या सोयीचा आहे. या जागेतून चांदणी तसेच उजनी पाणी पुरवठा योजनेतील जलशुध्दीकरण करुन जाणारी पाईपलाईन पूर्वीपासूनच नेण्यात आली आहे. येथे आमदार कोठ्यातील हातपंपही बसविण्यात आला आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्याची लाईनही नेण्यात आली असून अतिक्रमण धारकांनी यावरुन बोगस नळ कनेक्शन घेऊन वापर सुरु केला आहे.
सदरच्या जागेची पाहणी करण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी गेले असता त्यांनी अतिक्रमण धारकांना बेकायदा बांधकाम थांबविण्याच्या सूचना केल्या परंतु त्यांना धमकावण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अतिक्रमण धारकांना याबाबत प्रश्‍न विचारला असता ही जागा आमच्या समाजाची असून आम्ही ती विकत घेतल्याचे सांगत आहेत. याखालून पाण्याची पाईपलाईन गेली का अशी विचारणा केली असता गेली आहे परंतु त्यापासून दोन फूट अंतर सोडूनच आम्ही आमच्या वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम सुरु केले असल्याचे सांगत आहेत. सदरची जागा सरकारी आहे तर ही जागा कोणत्या प्रकारे खरेदी विक्री झाली याचीही चौकशी करणे गरजेचे आहे.

 
Top