उस्मानाबाद - कुसुमाग्रजांचे साहित्य मूल्य, विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक प्रभावीपणे समाजमनात रूजविण्याचे काम करते. मानवाला केंद्रबिंदू मानून त्यांनी केलेले लिखान आजही अनेक प्रश्‍नांना सहज भिडण्याचे सामर्थ्य देवून जाते. त्यामुळे कुसुमाग्रजांचे साहित्य नीतीमुल्यांसाठी सतत संघर्ष करण्याचे बळ देत असल्याचे प्रतिपादन व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशां
त चौधरी यांनी केले. 
मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यंकटेश महाजन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष राजेंद्र अत्रे तर प्रा. महेंद्र चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
डॉ. चौधरी यांनी कुसुमाग्रजांच्या एकूण साहित्य कृतींचा धावता मागोवा घेतला. त्यांनी अनुवादित केलेल्या नाटकांचे कथानक भारतीय समाजव्यवस्थेतील प्रश्‍नांना सोबत घेवून कशा पध्दतीने मांडले, याची अनेक उदाहरणे चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना दिली. इंग्रजी नाटकांच्या केवळ संकल्पना कुसुमाग्रजांनी स्वीकारल्या आणि त्याचा स्वयंअनुवाद करीत असताना महाराष्ट्र आणि भारतीय समाज डोळ्यासमोर ठेवून नाटकांचे लेखन केले. त्यामुळेच त्यांचा नटसम्राट असेल, ऑथेलो असेल, असी कितीतरी नाटके आजही मराठीत माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या साहित्यकृतींचा अधिक सजगपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यातून मानवतावादी मूल्यांची जोपासणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
प्रा. चंदनशिवे यांनी केशवसुतांच्या सामाजिक अंगाला कुसुमाग्रजांनी आपल्या कवितांमधून खर्‍या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे नमूद केले. त्यांनी कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांचे दाखले देत त्यात वापरलेल्या प्रतिमा सर्वसामान्यांच्या जीवनात पावलोपावली आढळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. राजेंद्र अत्रे यांनी अध्यक्षीय समारोपात कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा दिला. कुसुमाग्रज म्हणजे साक्षात वैज्ञानिक दृष्टिकोन, अशा शब्दांत त्यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्यातील दाखले दिले. त्यानंतर कवी पी. डी. कांबळे, युवराज नळे, प्रा. अरविंद हंगरगेकर, हनुमंत पडवळ, ऍड. वा. मा. वाघमारे, रवींद्र केसकर, बालाजी तांबे यांनी कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापचे सचिव बालाजी तांबे यांनी तर आभार हनुमंत पडवळ यांनी मानले. कार्यक्रमास मसापचे पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. 

 
Top