नळदुर्ग -  तुळजापूर पंचायत समिती स्‍तरावरील निधी वितरणात सावळा गोंधळ होत असल्‍याचे चव्‍हाट्यावर आल्‍याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे. याप्रकरणी  पं.स. सदस्‍यात नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्‍यान तालुक्‍यातील सर्व गणांमध्‍ये हा निधी विभागून मिळावा यासाठी गटविकास अधिकारी यांच्‍याकडे सदस्‍यांनी तक्रार केली आहे.  परंतू सदस्‍यांनी निधीसाठीचे लेखीपत्र देवूनही वितरण होत नाही. त्‍यामुळे निधी समान वितरण व्‍हावे म्‍हणून काही पंचायत समिती सदस्‍यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना प्राप्‍त झालेल्‍या निधीमध्‍ये समान वितरण व्‍हावे अशी मागणी केली आहे.   विद्यमान उपसभापती समान निधी वितरणाच्‍या बाबतीत बगल देत असून समान निधी न करता  स्‍वत:च्‍या सोयीच्‍या ठिकाणी हा निधी खर्ची करण्‍याच्‍या मानसिकतेत आहे. यापूर्वीच्‍या काही निधीमध्‍ये उपसभापतींनी मनमानी केली आहे.
       तुळजापूर पंचायत समितीमध्‍ये सतत समान निधी बाबत गोंधळच उडालेला कायम स्‍वरूपी चर्चेत आहे. तत्‍कालीन गटविकास अधिकारी तृप्‍ती ढेरे यांनी असाच गोंधळ उडाल्‍यावर समान निधी वितरण करण्‍याचा निर्णय केला होता. मात्र त्‍यालाही फाटा देण्‍यात येत आहे.
   अनेक सदस्‍यांनी 13 व्‍या वित्‍त आयोगातील पंचायत समिती स्‍तरावरील निधीचे सर्व गणामध्‍ये समान पध्‍दतीने वितरण व्‍हावे याबाबत दि. 1 सप्‍टेंबर 2012 रोजी निवेदन देवून याप्रकरणी आवाज उठविला होता. त्‍यानंतर दोन - तीन निधीमध्‍ये समान वितरण करण्‍यात आले होते. मात्र त्‍यानंतर त्‍याला फाटा देण्‍यात येत आहे. त्‍यामुळे पंचायत समितीमध्‍ये काय चालले हा प्रश्‍नचिन्‍ह नागरिकांसमोर येत आहे. याप्रकरणी उस्‍मानाबाद मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी  चौकाशी करण्‍याची मागणी  होत आहे.

 
Top