उस्मानाबाद - राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आता किती योजना सुरु आहेत, गावस्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमुळे किती योजनांना विलंब झाला, किती योजना तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित आहेत आणि या योजनांच्या धीम्या गतीला जबाबदार कोण, याची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेला मंगळवारी दिले. 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. नारनवरे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धिरज पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चाटे यांच्यासह या विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी ही योजना सुरु असलेल्या गावांचा तपशीलवार आढावा घेतला. योजना कधी सुरु झाली. या योजनेची सद्यस्थिती काय आहे, कोणत्या कारणांमुळे योजना रखडली, याची माहिती त्यांनी संबंधीतांकडून घेतली. ज्या प्रकरणी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत, तेथील कामांच्या निविदा तात्काळ संबंधीत गावच्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने काढणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी कामे धीम्या गतीने सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कामे सुरु आहेत, तेथे जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांमार्फत खर्चाचे लेखा परीक्षण करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा परिषदेला दिले. संबंधीत गावच्या पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष व सचिव यांच्यामुळे अथवा सरपंचांमुळे योजना रखडली असेल, तर त्यासंदर्भातील खर्च वसुलीची कार्यवाही संबंधीतांकडून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
ज्या अर्थी गावाच्या पदाधिकाऱ्यांकडून योजनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न केले जात नाहीत, त्याअर्थी गावाला त्या योजनेची गरज नसल्याचे दिसते. अशा परिस्थितीत टंचाई सुरु असताना टॅंकर्सची मागणी केल्यास त्याचा खर्च संबंधीतांकडून वसूल केला जाईल तसेच अशी गावे या योजनेतून वगळण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.  एखाद्या योजनेचे काम सुरु केल्यानंतर ते थांबवणाऱ्या कंत्राटदारांवरही दंडाची प्रक्रिया सुरु करा, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रत्येक गावातील पाणी उद्भवाच्या ठिकाणी जल पुनर्भरणाची कामे जलयुक्त शिवार अभियानात हाती घ्यावीत, अशा सूचना केली. 

 
Top