उस्मानाबाद - वन ही राष्ट्रीय संपत्ती असून वन विकासासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली मानसिकता बदलली पाहिजे. वन विभागांच्या क्षेत्रातील गायरान व अन्य जमीनीच्या अतिक्रमण व प्लॉट पाडून विकण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वनक्षेत्रासाठी राखीव असलेले कमी होत चालले आहे. यासाठी वनक्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या जमीनी ताब्यात घेणेसाठी सुक्ष्म आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी वन विभागाला दिले. 
येथील प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संयुक्त वन व्यवस्थापन समिती कार्यशाळा व संत तुकाराम वनग्राम योजना बक्षित वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.नारनवरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. मायकलवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ.शीतलकुमार मुकणे, विभागीय वन अधिकारी बी.एन.कदम, मार्गदर्शक सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी  राजेंद्र धोंगडे, बाळासाहेब हराळ, सहायक वनसंरक्षक जी.एस.साबळे, उपवनरंक्षक श्री.वळसे पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले की, जिल्ह्यातील वनांचा विकास व्हावा. वन सरंक्षणासाठी लोकांचा सहभाग  होण्यासाठी 95 समित्या स्थापन केल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून वन क्षेत्रात झाडे लावणे, चर खोदणे अशी श्रमदानाची कामे व्हावीत, असा या समित्या स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आहे. नोकरी व पगार यापुरतेच समिती न राहता विविध योजना राबवून वनांचे संरक्षण केले पाहिजे. वन क्षेत्रात झाडे लावणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी कुरणे ठेवणे, वन औषधी प्रकल्प उभारणे, जंगलामधील झाडांची वृक्षतोड होऊ न देणे, जलयुक्त शिवार, सिंमेटची नाला बंधारे, पाणलोटची कामे, संरक्षीत वनक्षेत्राच्या विकासासाठी ग्रामस्थांचे योगदान, मानव-वन्यजीव यांच्यासाठी यांच्यामधील संघर्ष कमी करुन सहजीवन प्रस्थापीत करणे, वन्यजीव संवर्धनातून मिळणारे फायदे ग्रामविकासाला वापरणे, ग्रामविकास साधत असतांना नजीकच्या संरक्षीत क्षेत्रावरील मानवी दबाव कमी करणे, गावनिहाय सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करुन गावांचा चिरंजीवी विकास साधण्यासाठी सर्व विभागांच्या मदतीने प्रयत्न करणे आदि विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. 
मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत म्हणाल्या की, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती, वृक्षतोड, जनावरांसाठी चाऱ्यांच्या प्रश्न सोडविण्याठी  आपली जबाबदारी  सर्वांनी जाणून घेऊन  वनांचा विकास करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. वन क्षेत्रात जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजनांची कामे व अशा प्रकारच्या विविध योजना  प्रभावी राबविल्यास वन क्षेत्रात विकास होऊन जनावरांना चारा, पाणी व सिंचन क्षेत्र वाढले. त्याचा फायदा इतर नजीकच्या शेतकरी बांधवांना होईल, यासाठी गावपातळीवरील श्रमदान व लोकसहभाग महत्वाचा दुवा आहे. गावपातळीवरील लोकांच्या मदतीने वन क्षेत्रात झाडे लावणे व अन्य कामांसाठी गावातीलच महिला व पुरुष बचतगटाचा सहभाग घ्यावा.  त्यामुळे वनांचा विकास होऊन उस्मानाबाद येथील वनक्षेत्र हिरवेगार होण्यासही मदत होईल, असे त्या म्हणाल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व मान्यवरांच्या हस्ते सन 2014-15 मधील जिल्हास्तरीय संत तुकाराम वनग्राम योजने मधील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार संयुक्त वन समिती गौर ता. कळंब यांना प्रथम, वडजी ता.वाशी यांना द्वितीय तर व्हतांळ ता.उमरगा येथील समिती तृतीय बक्षीस देण्यात आले आहे. बक्षीस प्रथम 51 हजार, द्वितीय 31 हजार तर तृतीय साठी 11 हजाराचे बक्षीसाचेही वितरण यावेळी करण्यात आले. 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी बक्षीस प्राप्त समितीचे अभिनंदन करुन कौतूक केले.  
या कार्यशाळेस राजेंद्र धोंगडे यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामवने, संत तुकाराम व जे.एफ.एम. या संदर्भात, बाळासाहेब हराळ यांनी आदर्श वन ग्राम तयार करण्याच्या पध्दती, डॉ.शीतलकुमार मुकणे यांनी पशुपालन व दुग्ध विकास विषयी मार्गदर्शन केले.    
          श्री.कदम यांनी प्रास्ताविकात  जिल्ह्यातील वन क्षेत्र व वन सरंक्षणासाठी विविध योजना राबवून करत असलेल्या  विविध विकास कामे व वन विभागाची वाटचाली संदर्भातील माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे दिली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री.साबळे यांनी केले तर आभार व्ही.एस.म्हेत्रे यांनी मानले. या कार्यशाळेस  वन परिक्षेत्र अधिकारी  तुळजापूर, भूम, उमरगा, अहमदपूर, लातूर व निलंगा तसेच विभागातील सर्व वनपाल,वनरक्षक व जिल्ह्यातून व विभागातून गाव पातळीवर विविध समितीचे अध्यक्ष, सदस्य, सामाजीक वनीकरण व वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.  
 
Top