उस्मानाबाद -  वाढत्या शहरीकरणामुळे जमीनमोजणी हा महत्वाचा घटक झाला आहे. त्यामुळे तंतोतंत आणि नव्या तंत्रज्ञानामुळे अचूक जमीन मोजणी होऊन नागरिकांच्या तक्रारी कमी होतील, त्यासाठी भूमापक आणि तलाठी यांना सखोल प्रशिक्षण अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. 
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात भूमी अभिलेख विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने भूमापक आणि तलाठी यांचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे बोलत होते. अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी एम. पी. मगर, तहसीलदार सुभाष काकडे लायका कंपनीचे नितीन लाखा आदींची उपस्थिती होती.
जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून भूमी अभिलेख कार्यालयाला एक कोटी 30 लाख रुपयांचे अत्याधुनिक ईटीएस मशीन्स घेण्यात आले आहेत. या मशीनचा वापर, मोजणी पद्धत आदींबाबत भूमापक आणि तलाठी यांना प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आठही तालुक्यातून प्रत्येकी पाच याप्रमाणे 40 तलाठी व 40 भूमापक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, हे मोजणी प्रशिक्षण तलाठी आणि भूमापक यांना उपयुक्त ठरणार आहे. अत्याधुनिक मशीन्सद्वारे जमीन मोजणी केल्याने अचुकपणा येणार आहे. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी होईल तसेच यापूर्वीच्याही तक्रारी निकाली निघू शकतील. अशा प्रकारे जमीनींची मोजणी झाली तर जमीन खरेदी विक्री वेळी त्या जागेचा नकाशाच संबंधितांना देता आला तर शासनाच्या महसूलातही भर पडेल आणि नागरिकांचीही सोय होईल, असे त्यांनी नमूद केले. 
अचुक जमिनीमुळे मालकी कोणाची हा प्रश्न उद्भवणार नाही. योग्य जमीन मोजणीमुळे शासनाच्याही सार्वजनिक जमिनींची मालकी आणि त्याचा ताबा व्यवस्थितपणे राखता येईल, असे त्यांनी नमूद केले. 

 
Top