मंगळवेढा (समाधान फुगारे) -: मनुष्य जन्म ही ईश्वराने दिलेली मौल्यवान देणगी आहे. ईश्वराने दिलेल्या या देणगीचे योग्य जतन करणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. समाजातील तळागाळातील लोकांच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्याचा वसा व मंगळवेढा तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प ग्रामीणरूग्णालयाने केला आहे. पाच वर्षांत तालुक्यात ३११0 वृद्ध नागरिकांच्या पुणे येथील देसाई हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डोळ्यापुढे अंधार घेऊन जगणार्यांच्या आयुष्याचा प्रवास तिमीराकडून तेजाकडे करण्यात मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयाने पुढाकार घेतला आहे.
जन्मत:च किंवा अपघाताने तसेच वयोमानानुसार अंधत्व आल्याने अनेकांना आयुष्यभर डोळ्यासमोर अंधार घेऊन जगावे लागते. संकटाचा सामना करत जगणार्या या अंधांच्या आयुष्यात हास्य फुलविण्यासाठी नेत्रदानाची चळवळ ही प्रभावीपणे राबविण्याचे काम ग्रामीणरूग्णालयातील नेत्र विभागाचे डॉ. अनिलराव यादव करीत आहेत. शहरातील सामाजिक उपक्रम राबविणार्या वारी परिवाराने नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे. त्यांनी फॉर्मही भरून दिले आहेत. मृत्यूनंतरही आपल्या प्रियजनांच्या नेत्र रूपाने स्मृती जपण्यासाठी नेत्रदान करण्याचे आवाहन नेत्र विभागाच्या वतीने करण्यात येते.
विकासाच्या बाबतीत मागासलेला व दुष्काळी तालुका ओळख असली तरी येथे कोणतेही मोठे नेत्र रूग्णालय नसतानाही ग्रामीणरूग्णालयाचे डॉ. अनिलराव यादव २0११ पासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्रदानाच्या बाबतीत अव्वल काम करत आहेत. २0११ पासून ऑगस्ट २0१५ पर्यंत ३११0 वयोवृद्ध नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मंगळवेढा तालुक्यासह चडचण, मोहोळ, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील नागरिकांनी घेतला आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीतही ग्रामीणरूग्णालय नेहमी तत्पर असते.
ग्रामीण रूग्णालयातर्फे प्रत्येक सोमवारी व गुरूवारी तसेच भोसे येथे दर बुधवारी नेत्र तपासणी शिबीर घेतले जाते. या शिबिराच्या माध्यमातून तपासणी झालेल्या वृद्ध नागरिकांवर गरज भासल्यास शस्त्रक्रिया केली जाते. अथवा त्याला चष्मा देऊन दृष्टी वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या वृद्ध नागरिकांचे ऑपरेशन असते, अशा नागरिकांना पुणे येथे मोफत येणे-जाणे, राहणे, जेवणाची व्यवस्था केली जाते. ऑपरेशन एच. व्ही. देसाई हॉस्पिटलमध्ये करण्यात येते.
सन २0१0-११ मध्ये ७0५, २0११-१२ मध्ये ७३४, २0१२-१३ मध्ये ७२१, २0१३-१४ मध्ये ५९0, एप्रिल २0१४ ते ऑगस्ट२0१५ मध्ये ३६0 नागरिकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तालुक्यातील २२२ तरूणांनी नेत्रदानाचे फॉर्म भरून दिल्याची माहितीही डॉ. अनिलराव यादव यांनी दिली.
कोट- वारी परिवारातील २२२ तरूणांनी नेत्रदानासाठी फॉर्म भरून दिले असून सन २0११ पासून ऑगस्ट २0१५ पर्यंत ३११0 मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.अंधांच्या प्रकाशवाटा उजळण्याचे काम नेत्र विभाग यापुढेही जोमाने करत राहणार आहे.- डॉ. अनिलराव यादव,नेत्र विभागप्रमुख, ग्रामीणरूग्णालय, मंगळवेढा
