मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भातील उपाययोजना आणि दुष्काळी जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. 
ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाडयातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर दुष्काळा संदर्भातील उपाययोजना व दुष्काळी जनतेच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास १४ सप्टेंबरपासून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दुष्काळग्रस्त जनतेच्या प्रश्नांकडे कानाडोळा करणा-या असंवेदनशील सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली या आठही जिल्ह्यात जेलभरो जनआंदोलन करण्यात येणार आहे.
 
Top