मंगळवेढा (समाधान फुगारे) 'मोरया.. मोरया..'चा जयघोष अन् ढोल-ताशांच्या गजरात गुरूवारी शहर व तालुक्यातील गावोगावी मोठय़ा जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाचे आगमन झाले. अबालवृध्दांची लगबग सुरू असतानाच सायंकाळी गणरायाच्या स्वागताला वरूणराजानेही हजेरी लावली. शहर व तालुक्यात २१२ मंडळांनी पोलिसांकडे रितसर नोंदणी करून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली.
                  तालुक्यात २१ गावात एक गाव एक गणपती बसवून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ग्रामीण भागात १६९ आणि शहरामध्ये ४३ ठिकाणी गणेशोत्सव मंडळाने परवाना घेतलेला आहे. मंगळवेढा शहर व तालुक्यात नागरिकांनी मोठय़ा उत्साही वातावरणात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 

गुरूवार सकाळपासून मूर्ती प्रतिष्ठापनेला सुरूवात झाली. जयमल्हार गणेश मूर्तीला नागरिकांनी पसंती दिल्याने याची मोठी मागणी बाजारपेठेत होती. सकाळी ६ वाजल्यापासून बाजारपेठेत गणेशाची मूर्ती खरेदी करण्यास नागरिकांनी सुरूवात केली. ग्रामीण भागातून ९ वाजता नागरिक बाजारपेठेत दाखल झाले. सुमारे ५0 रूपयापासून ते ५00 रूपयापर्यंत आणि मंडळासाठी ५00 रूपयापासून तीन हजारापर्यंत गणेशमूर्ती बाजारपेठेत उपलब्ध होत्या. 
सध्या झी मराठी वरील मालिका जयमल्हार, लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, महालक्ष्मी, कमळ फुलातील, साईबाबा, पाण्यातील माशावरील, आजोबा गणपती असे विविध आकाराचे गणपती बाजारामध्ये विक्रीस आले होते. परंतु, सर्वात जास्त मागणी जयमल्हार गणेशमूर्तीला होती. 

दुपारनंतर विविध मंडळांनी वाजतगाजत गणेशमूर्त्या घेऊन मूर्तीची स्थापना केली. तर घरी बप्पाचे आगमन झाल्यानंतर पुजा करून आरती करण्यात आली.

 
Top