पांगरी (गणेश गोडसे) :- 'पांगरी ग्रामीण रुग्णालय सलाईनवर' अशा ठळक मथळ्याखाली 'तुळजापूर लाईव्ह' वर शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी पांगरी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागांसंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जागे झालेल्या आरोग्य कमिटी सदस्य व संतप्त ग्रांमस्थांनी ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता साडेअकराची वेळ होऊनही रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे रागाचा पारा चढलेल्या रुग्ण व ग्रांमस्थांनी सरळ ग्रामीण रुग्णालयालाच कुलूप ठोकण्याचा अयशस्वी प्रत्यन केला. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व स.पो.नि.सोमनाथ वाघ यांच्या मध्यस्थीने 108 आरोग्य सेवेच्या वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्ण तपासण्यास सुरुवात केल्यामुळे या प्रकरणावर तात्पुरता पर्याय काढून कुलूप ठोको आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण तपासणी (ओ.पी.डी.) वेळ सकाळी 9.30 ची होती. आज रविवार रोजी पांगरीचा आठवडी बाजार असल्यामुळे परिसरातील अनेक गांवामधून शेकडो रुग्ण वैद्यकीय अधिकार्यांच्या प्रतीक्षेत होते. सकाळचे 11.30 होऊनही एकही डॉक्टर नसल्यामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांनी व दरम्यान पांगरीतील जागरूक नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.लोकांची गर्दी वाढत आतानाच श्री.वाघ यांनी पांगरीच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी भोपलकर यांच्याशी भ्रमणधव्नीवर संपर्क साधून आंदोलकाचा समेट घालून दिला. वैराग येथील एक वैद्यकीय अधिकारी तात्पुरता पांगरीसाथ्गी देण्याचे आश्वासन रुग्ण व आंदोलकांना देण्यात आल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकांचा पारा शांत झाला.
पालथ्या घाड्यांवर पाणी या म्हणीप्रमाणे संतप्त झालेल्या पांगरी परिसरातील रुग्णांच्या सहनशीलतेचा अंत प्रशाशन अजून किती दिवस पाहणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत होता.आधीच दुष्काळ त्यात गरिबांचा दवाखाना असलेल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता असल्यामुळे परिसरातील रुग्णांना अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत.तरी संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष केंद्रीत करून रिक्त जागा तत्काळ भराव्यात.
