उस्मानाबाद - गणेशोत्सव अधिक लोकाभिमुख व्हावा, त्यातील ओंगळवाणेपणाला फाटा देत सामाजिक उपक्रमाची देवाणघेवाण व्हावी यासाठी पत्रकार संघाने राबविलेला उपक्रम महत्वपूर्ण आहे. मिरवणूक मार्गावर छोट्या बकेटमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करीत उस्मानाबादमधील गणेश मंडळांनी दिलेला संदेश पुढील काळात महाराष्ट्र नक्की अंगीकारेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने यंदाही मुख्य मिरवणूक मार्गावर शिस्तबध्द श्रीगणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित गणेशभक्तांना शुभेच्छा देताना डॉ. नारनवरे बोलत होते. मंचावर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, सरचिटणीस विशाल सोनटक्के यांच्यासह स्पर्धेचे प्रायोजक आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार संघाच्यावतीने सुरू असलेल्या या स्पर्धांमुळे गणेश मंडळांमध्ये विधायक उपक्रम राबविण्याची स्पर्धा लागली आहे. उत्सवातून अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. हा गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेला पायंडा कौतूकास्पद आहे. स्वावलंबन गणेश मंडळाची संकल्पनाही अनेक गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात राबविली असल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी उत्सव आनंदाने साजरा करण्याबरोबरच त्याला गालबोट लागणार नाही, याची काळजी सर्वच गणेश मंडळांनी घेतल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. तर पत्रकार संघाच्या उपक्रमामुळे शांतता व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे सहकार्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन न करता पालिकेकडे मूर्ती दान केल्याबद्दल मंडळांचे आभार मानले.
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी, राज्यातील जनतेला दुष्काळातून दिलासा मिळावा यासाठी भरपूर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना यावेळी गणेशभक्तांच्या साक्षीने केली आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी उत्सवाला बघल देत शेतकर्यांच्या दुःखात सहभागी होत राबविलेल्या उपक्रमांचे कौतूक केले. यावेळी धीरज पाटील यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. मुख्य मिरवणूक मार्गावरून यंदा २८ गणेश मंडळांनी लेझीम, ढोलताशे, झांज, अशा विविध पथकातून आपल्या कलांचे आकर्षक सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे निमंत्रक अनंत आडसूळ, देवीदास पाठक, रविंद्र केसकर आणि महेश पोतदार यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रा. प्रशांत गुरव, प्रा. अशोक गोरे आणि प्रा. डॉ. मिलींद माने यांनी परिक्षक म्हणून कामगिरी पार पाडली.
नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांचा सत्कार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी शहरातील गणेश मंडळांना गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान करावी, असे आवाहन केले होते. त्याला शहरातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद दिला. तब्बल ४२ गणेश मंडळांनी आपल्या मूर्तीचे विसर्जन न करता त्या मूर्ती पालिकेला दान दिल्या आहेत. वर्षभर या मूतींचे नगरपालिकेच्यावतीने जतन केले जाणार असून या मूर्ती त्या-त्या मंडळांना पुढच्या वर्षी परत केल्या जाणार आहेत. अभूतपूर्व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी घेतलेला हा निर्णय पालिकेच्या पुढाकारामुळे अंमलात आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचा यावेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.