उस्मानाबाद -: मागील सहा दशकांपासून उस्मानाबाद शहरात अत्यंत तळमळीने वैद्यकिय व्यवसाय करणारे डॉ. सय्यद शहा अखलाख यांना उस्मानाबाद गौरव पुरस्काराने रविवारी सन्मानीत करण्यात आले. सबंध आयुष्यभर मोठ्या तळमळीने विविध क्षेत्रात योगदान देणार्या मान्यवरांना जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने उस्मानाबाद गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यंदा ११ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि फेटा देवून डॉ. अखलाख यांना माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील आणि दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
मागील ६० वर्षांपूर्वी शहरात आरोग्य सेवा नावाचा प्रकार तुरळक होता. त्या काळात डॉ. अखलाख यांनी वैद्यकिय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याच शहरात सेवा देण्यास प्रारंभ केला. या सहा दशकांत शहर आणि परिसरातील जवळपास सर्वच रूग्णांना त्यांचा प्रामाणिक स्पर्श झालेला आहे. डॉ. अखलाख यांचा स्पर्श म्हणजेच उपचार, असे समीकरणच जिल्ह्यात रूढ झाले आहे. त्यांनी केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने त्यांना उस्मानाबाद गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. थरथरत्या हाताने डॉ. अखलाख यांनी हा सन्मान स्वीकारताच सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी त्यांचे वडील शुरसेन कुमूदराव राजेनिंबाळकर यांच्या स्मरणार्थ या पुरस्कारासाठी ११ हजार रूपयांची रक्कम कायमस्वरूपी प्रायोजित केली आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. अखलाख यांनी मिळालेली पुरस्काराची रक्कम दुष्काळग‘स्त शेतकर्यांच्या मदतीसाठी पत्रकार संघाच्या हवाली केली.
