उस्मानाबाद  - टंचाईच्या मुकाबला करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची जोड हवी. हेच ओळखून जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावात स्वयंसहायता महिला गटाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात महिलांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टंचाई परिस्थिती व एकंदरीतच आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जल व्यवस्थापन, जमीन व्यवस्थापन, जंगल व्यवस्थापन, जनावर व्यवस्थापन, आणि जन व्यवस्थापन (लोकसहभाग/लोकचळवळ ) या पाच ‘ज’ कारांची उजळणी व्हायला हवी, असा सूर यावेळी निघाला.
निमित्त होते, स्वयं शिक्षण प्रयोग आयोजित दुष्काळ निर्मूलन अभियानाचे! जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही.डी. लोखंडे, आत्माचे उपसंचालक श्री. चोले,  महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे समन्वयक डॉ. केशव सांगळे,  तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे व्ही.डी. टाकणखार, स्वयं शिक्षण प्रयोगच्या नसीम शेख, विकास कांबळे, उपमन्यू पाटील, लक्ष्मीकांत माळवदकर, लीला सोमवंशी आणि किरण माने यांची यावेळी उपस्थिती होती.
स्वयम् शिक्षण प्रयोग 1993 च्या आपत्तीपासुन लातूर -उस्मानाबादसह महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातून काम करते. महिला व लोकसहभागातून काम करतांना टंचाईची चाहुल ओळखुन महिला सहभागातून 6 हजार महिला शेतकरी यांचा समुह तयार केला. यापैकी शंभरच्यावर  महिला स्वत:  प्रशिक्षकाची जबाबदारीही पार पाडतात. शेतीमध्ये काय करावे व काय नको याची माहिती व अनुभव एकमेकींना सहज देण्याचे काम त्या करतात. राज्य शासनाच्या विविध योजना प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
यावेळी येथे आलेल्या विविध महिलांनीही आपले अनुभव कथन केले. त्याचबरोबर प्रकल्प संचालक डॉ. सातपुते म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी महिलाच शेती व गावगाडा सांभाळायच्या. पुरुष दुर्दैवाने आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात करतात. महिला आत्महत्या रोखतात. दुसर्यांना प्रेरणा देतात. अनेक यशकथा महिलांनी स्वताच्या हिंमतीवर रचल्या आहेत. इतरांच्या प्रगतीत हातभार  लावला आहे. पाच ज चा प्रसार  व प्रचार करा. कठीण समस्यावरही महिलांकडे सहज उपाय असतात. आता दुष्काळावर मात करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. झाडे लागवड वाढवली पाहिजे. आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान पुढाकार घेत आहे. एसएसपीचा यात मोलाचा वाटा आहे. आम्ही महिलांना गटवार खेळतं भांडवल देत आहोत. आपल्या जिल्ह्यात उमेद पशुपालन संघाची स्थापना करतोय. पारंपारिक बरोबर नविन व्यवसायही करा. योग्य माहिती व प्रशिक्षण असेल तरच कार्य यशस्वी होईल. दुष्काळाचे आव्हान यशस्वी परताऊन लावू, दुष्काळ हरेल आम्ही जिंकु असा आत्मविश्वास बाळगा. आपला हा जिल्हा ताठ मानेनं जगणारा जिल्हा आहे हे सिध्द करु, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. लोखंडे यांनी  शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी  महिलांची प्रगती आधी झाली पाहिजे, असे सांगितले. आत्माच्याव्दारे आम्ही अशा कामांना सर्व विभागांचे सहकार्य घेत कायम साथ देऊ. केव्हीके, एसएसपी, एमएसआरएलएमचे गटांनी यासाठी पुढाकार घ्यावा. अंडी उबवण्याची यंत्रे तुळजापूरला उपलब्ध करुन देऊ, महिलांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
श्री. चोले यांनी,  10 गुंठ्यात पॉलीहाऊस सारखी शेती करता येते, तीही फायदेशीरपणे असे सांगितले. त्याशिवाय, 10 गुंठ्याच्या शेडनेटमध्ये 4-5 लाखाचे उत्पन्न घेता येते. शेतीला बांधाने पाणी थांबवा. ठिबक व प्लास्टीकचे मल्चिंग करुन कमीत कमी पाण्यात शेती करा. यासाठी आत्मा योग्य सल्ला व मार्गदर्शन करेल. एसएसपीने पुढाकार घेऊन महिलांची कंपनी स्थापावी. आवश्यक ती सर्व मदत आत्मा करेल, असे त्यांनी नमूद केले.  श्री. टाकणखार यांनी, तलावाच्या गाळाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले. ऊसाला पर्यायी पीक म्हणून बटाटा हा ऊसापेक्षा चारपट कमी पाण्यात येतो. व एकरी 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न येते, कांदाही तसाच घेता येतो. आपल्या भागात तूर चांगली आहे, तुरीला चांगला भाव आलाय. फक्त तुरीला फवारणी करुन चांगले पीक घेता येईल, असे मार्गदर्शन केले.
डॉ. सांगळे यांनी, पाणी व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे नमूद केले. यावेळी विविध महिलांनी आपले मनोगत मांडले. त्यातून त्यांनी त्यांच्या यशकथा सांगितल्या.  परिस्थितीशी दोन हात करीत यश मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


वैशाली घुगे यांनी, पाऊस नाही,पाणी नाही,चारा नाही, अशा परिस्थितीत ॲझोला निर्मिती प्रशिक्षण मिळाल्याचा लाभ झाल्याचे सांगितले. आता टंचाई परिस्थितीतही आम्ही 10 लिटर दुध मिळवतो.  ॲझोला निर्मितीसह हायड्रोपोनिक्सचोही प्रशिक्षण मिळाले. आठ दिवसात उत्तम चारा मिळतो. जनावरांसाठी फारच पोषक आहे. एकुण 10 जनावरे आहेत त्यापैकी 4 दुभती आहेत. या दोन्हीमुऴे चाऱ्याचा प्रश्न मिटला. सेन्द्रीय खत पण बनवते, असे त्यांनी सांगितले.
हिंगलजवाडीच्या कमलताई कुंभार यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. शेती नव्हती. लिजवर 5 एकर घेतली.  शेवगा व सुबाभळ घेतली. पालेभाज्या, कुकुट पालन आदी केले. शेतीतील विंधन विहीरीचे पुर्नभरन केले. त्यामुळे  पाणी वाढले. सोबत, शेळीपालन केले. चारानिर्मितीसाठी ॲझोला व हायड्रोपोनिक्स केले. त्यामुळे स्वयंपूर्णतेचा अनुभव आल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
     काटगावच्या संजीवनी माळींनीही आपले अनुभव सांगितले. तळ्यातली माती  शेतात टाकल्याने पाऊस कमी असतांनाही चांगली पीकं आली. नापीक जमीन पिकाऊ झाली. शासनाच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्याने फायदा दिसू लागला. बीज प्रक्रीया, सेंद्रीय शेतीमुळे दुष्काळ सुध्दा निष्फळ ठरतो. शासनापर्यंत आपण स्वत पोहोचा. त्यातूनच माळरानाची शेती आता पिकाऊ झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अनसुर्ड्याच्या अर्चना माने यांनीही शेवग्याच्या शेतीची कहाणी सांगितली. बीजप्रक्रीया व सेंद्रीय शेती केली. फवारणी साठी पाल्यापासुन किटकनाशक बनवले. शेवगा चांगला आला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
नीलेगावच्या निर्मला मोरे म्हणाल्या की, महिलांना पीकाबाबत मार्गदर्शन केलं. कारल्याचे पीक घेतले.  आमच्या शिवारात कमी पाणीखाऊ पीकं वाढवलेत. राशनची योजना लोकांना सांगीतली. आता सर्व दुकानात ही योजना चांगली राबवली गेली. आपण लोकांना लाभ देण्याच्या योजना पुढाकार घेऊन राबवून घ्यायच्या असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. कांबळे यांनी केले

 
Top