उस्मानाबाद - श्री तुळजापूर मंदिरातील शिवकालीन भांडयाची चोरी या मथळयाखाली दि.20 सप्टेंबर रोजी विविध वर्तमानपत्रात व काही वृत्तवाहीन्यावर बातमी प्रसिध्द झालेली असून या बातमीत मंदिरातील शिवकालीन ऐतिहासिक अनमोल भांडी चोरीला गेल्याचे छापून आलेले आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाचे वतीने खुलासा प्रसिध्दीस देण्यात आला आहे.
,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत शारदीय नवरात्र महोत्सव व शाकंभरी नवरात्र महोत्सवात ब्राम्हण भोजन व अन्नदानाचा कार्यक्रम मंदिराशेजारी असणारे भक्त निवासाजवळील सामल धर्मशाळेत आयोजित करण्यात येतो. शारदीय नवरात्र महोत्सव-2015 जवळ आल्याने व या महोत्सवात ब्राम्हण भोजन व अन्नदानाचा कार्यक्रम असल्याने पुर्वतयारीच्या दृष्टीने त्याठिकाणी ठेवण्यात आलेली स्वंयपाकाची भांडी धुण्यासाठी सबंधीत कर्मचारी त्याठिकाणी गेला असता त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या भांडयापैकी काही भांडी पितळी टोपले, भातवडया, पातेले, टोपले, परात, तांब्याची परात, स्टील बकेट ग्लास व वाटया कमी असल्याचे त्याचे निदर्शनास आले. कमी असलेली सदरील भांडी ही स्वयंपाकाची नित्य वापराची भांडी आहेत. सदरील बाब संबंधित कर्मचाऱ्यांने वरिष्ठांचे निदेर्शनास आणून दिलेली असून त्याने स्वयंपाकाची भांडी कमी असल्याबाबत कळविताक्षीच मंदीरप्रशासनामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे. भांडी कमी असल्याबाबत विचारणा करणारी नोटीस संबंधित कर्मचाऱ्यास बजावण्यात आलेली आहे.
बातम्यात प्रसिध्दी केल्याप्रमाणे सामल धर्मशाळेत ठेवण्यांत आलेली भांडी ही शिवकालीन ऐतिहासीक नसून सदरील भांडी ही अन्नदान व ब्राम्हण भोजनाच्या कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी वापरण्यात भांडी होती. मंदीरात असणाऱ्या ऐतिहासीक व पुरातन सोने, चांदी व इतर धातूच्या वस्तू या मंदीराचे खजिन्यात सुरक्षितरित्य ठेवण्यात आलेल्या असून सदर खजिना खोलीस पोलीस विभागामार्फत 1+3 हत्यारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या निगराणीत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यांत आलेली आहे. मंदीरातील सर्व मौल्यवान वस्तूंची नोंद स्टॉल बुकमध्ये घेण्यात येवून वेळोवेळी त्याची तपासणी केली जाते. ज्याचप्रमाणे सर्व मौल्यवान वस्तू या पोलीस संरक्षणात सुरक्षित आहेत.
तपासणीच्या वेळी नवरात्र महोत्सवात होणाऱ्या अन्नदान व ब्राम्हणभोजनाचे स्वयंपाकासाठी असणारी पितळी 19, तांब्याची 2 व स्टीलची 34 भांडी कमी असल्याचे आढळून आले आहे. धर्मशाळेत ठेवण्यात आलेली भांडी सांभाळण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर निश्चीत करण्यात आलेली होती. कमीअसलेल्या भांडयाबाबत मंदीर प्रशासनामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांवर नोटीस बजावण्यात आलेली असून कमी असलेल्या भांडयाबाबत त्यांचेकडून सविस्तर तपशील मागविलेला असून तपशील प्राप्त होताच संबंधितांवर आवश्यकतेनुसार योग्य ती प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
परंतू कोणत्याही सबळ पुरावा नसताना ऐतिहासीक व शिवकालीन वस्तू असल्याचे तसेच या वस्तू छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे अगोदरचे संस्थानीकांनी दिल्याचे खोटे विधान छापून केवळ वैयक्तीक स्वार्थासाठी विश्वस्तांची बदनामी करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या बातम्या प्रसिध्द करुन भाविकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही या खुलाशात मंदीर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान, तुळजापूर यांनी म्हटले आहे.