उस्मानाबाद - गणेश मंडळाच्या वर्गणीतून वायफळ उत्सवी खर्च करण्यापेक्षा दुष्काळाच्या झळा सोसणार्या आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी पुण्यातील गणेश मंडळाचे तरूण कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. श्री चिंतामणी ग्रुप आणि श्री साईबाबा मंदीर मंडळ यांच्यावतीने जिल्ह्यातील निराधार, आत्महत्याग्रस्त १०० कुटूंबांना अन्नधान्याच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मागील चार वर्षांपासून दुष्काळाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीशी निगडीत असलेल्या इतर व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. त्यातून मागील नऊ महिन्यात ११३ जणांचा कर्जबळी गेला आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत संकटात अडकलेला शेतकरी आणि दुसरीकडे उत्सवाच्या नावाखाली लाखो रूपयांची उधळपट्टी, असे विरोधाभासी चित्र असताना पुण्यातील गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत नवा आदर्श घालून दिला आहे.
जिल्ह्यातील निराधार, आत्महत्याग्रस्त, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता, अशा आर्थिक विवंचनेत अडकलेल्या १०० कुटूंबियांना या मंडळाच्यावतीने किमान दोन महिने पुरेल, एवढे अन्नधान्य आणि किराणा सामान त्याचबरोबर मायेची उब देण्यासाठी एक ब्लँकेट वाटप केले जाणार आहे. अन्नधान्याबरोबरच शेतकर्यांच्या दावणीला असलेल्या जनावरांची गैरसोय होऊ नये यासाठी या मंडळातील कार्यकर्ते चारा वाटप देखील करणार आहेत. गुरूवारी सकाळी १० वाजता सारोळा येथे तेर, तावरजखेडा, कामेगाव, पानवाडी, म्होतरवाडी या परिसरातील ३८ लाभार्थ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर रूईभर येथे उस्मानाबाद, बेंबळी, केशेगाव परिसरातील ३२ लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यानंतर लोहारा तालुक्यातील वडगाव, बेंडकाळ, धानुरी, सास्तूर आणि लोहारा परिसरातील गरजूंना लोहारा येथे मदतीचा हात दिला जाणार आहे. तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथील १३ लाभार्थ्यांनाही यावेळी मदत दिली जाणार आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी या तरूण कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार अनेक संस्था, संघटना आणि गणेश मंडळांना दिशादर्शक ठरेल, असा आहे.