उस्मानाबाद - अलीकडच्या काळात अध्यापन पध्दतीत अमुलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहू नये याकरिता शिक्षकांनी तत्पर रहायला हवे. प्रशिक्षणामुळे योग्य व अचूक दिशा मिळते आणि त्यातून मिळालेली ऊर्जा दैनंदिन कामकाजात उपयोगाला येते, असे मत मराठी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे यांनी व्यक्त केले.
   
शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या भाई उध्दवराव पाटील सभागृहात इयत्ता नववी आणि दहावीच्या जिल्ह्यातील मराठी विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या जिल्हास्तरीय कृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शिक्षण विभाग, मराठवाडा साहित्य परिषद, मुख्याध्यापक संघ आणि मराठी अध्यापक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लांडगे बोलत होते. सत्कार्याला जात, धर्म, पंथ नसतो आणि सद्गुणाला वार्धक्य नसते. त्यामुळे सत्कार्याची कास सोडू नका आणि सद्गुण वाढविण्यासाठी मन लावून कष्ट करा. हे कृतीसत्र त्यासाठीच आयोजित केले असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदूंबर उकिरडे यांनी केले. शिक्षकांनी शाळांमधील वा ग्रंथालये अद्ययावत ठेवायला हवी. त्यातून वाचन संस्कृती वाढेल. विद्यार्थी विचारांचे अदान-प्रदान करू लागतील आणि त्यातून भाषाविषयक आकलन वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कवी तथा पत्रकार रविंद्र केसकर यांनी मराठी भाषा आणि वाचन याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. छान वाचणारा माणूस घाबरत नाही. न घाबरणार्‍या माणसातच धाडस असते आणि धाडसी माणूसच तथ्य नसलेल्या परंपरांना विरोध करण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यासाठी वाचन एकमेव पर्याय असल्याचे केसकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. मराठी विषयाच्या शिक्षकाला चांगले बोलता, लिहिता आणि व्यक्त होता आलेच पाहिजे. बोललेले वाहून जाते, लिहिलेले टिकून राहते. त्यामुळे वाचेतून व्यक्त होण्याऐवजी लिखाणातून व्यक्त व्हायला सुरूवात करा. त्यामुळे अध्ययन देखील प्रभावी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास जिल्हाभरातील नववी आणि दहावीचे २०० शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापचे सचिव बालाजी तांबे यांनी, प्रास्ताविक मराठी अध्यापक मंडळाचे बाळू घेवारे यांनी तर आभार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एस. डी. कुंभार यांनी व्यक्त केले.

 
Top