उस्मानाबाद - या पुढील काळात जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी सांगितले.
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका जाहिर झाल्या असून या निवडणूका लढविण्या संदर्भात कळंब येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित शिवसेना, भाजपा व रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठकीस मार्गदर्शन करताना पाटील हे बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतिश देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित पिं
गळे, तालुकाप्रमुख रामलिंग आवाड व भाजपा तालुकाध्यक्ष अंकुश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. .
सुधीर पाटील पुढे म्हणाले की, या पुढील काळात जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका या शिवसेना, भाजपा, रिपाईसह महायुती म्हणूनच लढविण्याचे आदेश आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले असून त्याची काटेकोर अमंलबजावनी होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपले ख-या अर्थाने शत्रू असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकी संदर्भात या पक्षाशी आपले कांहीही देणेघेणे नाही. अपवादात्मक स्थितीत गरज पडल्यास आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी संबंधित पक्षाच्या पदाधिकारी किंवा नेत्याबरोबर चर्चा करावी. पण पुढील काळात महायुती म्हणूनच आपल्या बैठका होतील याची काळजी घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले.
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची निवड करण्याचे अधिकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे व तालुकाप्रमुख रामलिंग आवाड यांना देण्यात आल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. आणि कोणत्याही परिस्थितीत या निवडणूकीत कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामास लागावे असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचेही मार्गदर्शन झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून कार्यकत्र्यांनी जनतेच्या दृष्टीने जिव्हाळ्याची असणारी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीसाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मिनाज शेख, शिवसेना उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, शहर प्रमुख पांडूरंग कुंभार, विजय देशमुख, शिवाजी शेंडगे, बाबा मडके, बाळासाहेब शिनगारे, शितल चोंदे, बाळासाहेब समुद्रे, मंदार मुळीक आदी पदाधिका-यासह शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष अंकुश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
