![]() |
| उमाकांत मिटकर |
तुळजापूर :- भटके विमुक्तांच्या शिक्षण विषयातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल पुणे येथील लक्ष प्रतिष्ठानचा राजस्तरीय लक्ष सेवा पुरस्कार भटके विमुक्त विकास परिषदेचे पुर्णवेळ कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांना प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या भटके विमुक्त विकास परिषदेचे उमाकांत मिटकर हे 2002 पासून पुर्णवेळ कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी मसनजोगी समाज उमरगा, किनवट येथे जिल्हा प्रचारक असताना केलेले गोंड, मारी, भिल्ल, कोलाम या समाजातील काम, यमगरवाडी प्रकल्प, पालावरची शाळा इत्यादी क्षेत्रातील काम हे दखल घेण्यायोग्य आहे.
सध्या त्यांच्याकडे पालावरची शाळा समन्वयक अशी जबाबदारी आहे. या शाळेचे वैशिष्टय म्हणजे मुलांच्या सोईनुसार सुरु होणारी बिना भिंतीची शाळा आहे. पाटी, पुस्तके, फळा यांच्या आधाराशिवाय ही शाळा चालते. दगड, गोटे, पाने, फुले ही शैक्षणिक सामुग्री असते. त्या त्या समाजाच्या बोलीभाषेप्रमाणे अभ्यासक्रम तयार करणे चालू आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकानेही याची दखल घेतली आहे. तसेच युनोचा दक्षिण आशियाचा शिक्षण विषयातला पुरस्कारही या प्रयोगाला मिळाला आहे. एका शाळेपासून सुरु झालेला हा प्रयोग आता चार जिल्ह्यात 16 समाजामध्ये चालू आहे. संस्कारासोबतच बचतगट, आरोग्य, शासकीय कामे, व्यसनाधिता, स्वावलंबन या उपक्रमातून वस्तीच्या सर्वांगिण विकासाची अनेक केंद्रे उभी राहत आहेत.
लक्ष ही पुण्यातील संस्था असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक संस्थांना प्रशिक्षणाचे काम करते. सदरील कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात संपन्न झाला. यावेळी भारत सरकारच्या कला व साहित्य मंडळाच्या डॉ. अपर्णा गोसावी, लक्ष संस्थेचे बालाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मिटकर यांचे समाजातील विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.
उमाकांत मिटकर बोलताना म्हणाले की, हे काम करीत असताना एम.एड. झालो, आता लॉ ही करतोय. स्वार्थी भावनेने नौकरीच्या आशेने मी यमगरवाडीत आलो खरा, पण तो विचारही आता स्वप्नांत येत नाही. सामाजिक क्षेत्रातील काम हेच आता आयुष्याचे ध्येय झाले आहे. पण हे संघटनेच्या, रा.स्व. संघाच्या संस्काराशिवाय कदापिही शक्य झाले नसते.
