वाशी :- नुकत्याच झालेल्या बावी (ता.वाशी) ग्रामपंचायत निवडणूकीत गावातील मतदार व नागरीकांनी स्वाभिमानी पॅनलला निवडणून दिल्याबद्दल या पॅनलचे प्रमुख निखील कांदे-पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व ग्रामस्थांच्या सेवेसाठी अद्यावत यंत्र, सामुग्री असलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका गावास समर्पित केली.
वाशी तालुक्यातील बावी ग्रामपंचायतची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणूकीत सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक निखील कांदे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारावर मतदारांनी विश्वास दाखवून या पॅनलला निवडूण दिले. सरपंच व उपसरपंच पदाच्या काल झालेल्या निवडणूकीतही कांदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे उमेदवारच निवडणून आले. गावातील नागरीक व मतदारांनी व्यक्त केलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाल्याचे सांगून एक कृतज्ञता म्हणून कांदे - पाटील यांनी अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिकाच गावासाठी समर्पित केली. रुग्णवाहिका समर्पित करण्याचा कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर रोजी बावी येथे पार पडला.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना निखील कांदे-पाटील म्हणाले की, या गावातील मतदार व सामान्य नागरीकांनी माझ्या नेतृत्वाखाली पॅनल निवडणून देवून माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासास मी तडा जावू देणार नाही. या पुढील काळातही या गावासाठी जे कांही करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न राहिल असे सांगून दाखविलेल्या विश्वासाबद्दल कांदे पाटील यांनी गावक-यांचे आभार मानले.
