जिल्ह्यातील १०० कुटूंबांना पुण्यातील गणेश मंडळाची मदत
खचून जाऊ नका...
नव्या स्वप्नांकडे पहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत
उस्मानाबाद - समोर आलेले वाईट दिवस आयुष्यभर घर करून राहत नाहीत. संकटाच्या काळात खचून जाऊ नका. तुमच्या पाठीशी हजारो हात मदतीसाठी उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुःख, वेदना आणि मनातील आत्महत्यांचा विचार झुगारून नव्या स्वप्नांकडे पहायला सुरूवात करा आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा आश्वासक शब्दात पुणे येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा दिला.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्या १०० कुटूंबियांना पुणे येथील श्रीचिंतामणी ग्रुप आणि साईबाबा मंदीर मंडळाच्यावतीने गुरूवारी अन्नधान्य, किराणा सामान व ब्लँकेट तसेच जनावरांना चारा वाटप करण्यात आले. उस्मानाबादमधील भीषण दुष्काळाच्या अनेक बातम्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचल्या. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या कार्यक्रमावर आगाऊ खर्च न करता त्या पैशातून १०० कुटूंबियांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून शंभर कुटूंबियांच्या किमान दुःखात सहभागी होता आल्याचे समाधानही पुण्याहून आलेल्या गणेश मंडळाच्या २५ कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. या शंभर लाभार्थ्यांना १० किलो ज्वारीचे पीट, १० किलो तांदूळ, पाच किलो साखर, दोन किलो तूरदाळ, दोन किलो मसूर दाळ, पाच किलो बेसन, तेल, मीठ, तिखट, हळद याबरोबरच ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गुरूवारी सकाळी १० वाजता उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे तेर, तावरजखेडा, कामेगाव, पानवाडी, म्होतरवाडी आणि सारोळा येथील ३८ लाभार्थ्यांना मदतीचा हात तर ६० पशुपालकांना चारा वाटप करण्यात आला. यावेळी सारोळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास पाटील, सरस भारत अकादमीचे सुनिल बडुरकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले. दुपारी २ वाजता रूईभर येथे जयप्रकाश विद्यालयाच्या प्रांगणात बेंबळी, रूईभर आणि उस्मानाबाद येथील ३२ लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू आणि १२ पशुपालकांना चारा वाटप करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे आणि सुभाष कोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर लोहारा येथे स्थानिक पत्रकार संघाच्या मदतीने वडगाव, बेंडकाळ, धानुरी, सास्तूर आणि लोहारा येथील १९ लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथील १३ गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
