
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानीचे हे रुप डोळ्यांत साठवण्यासाठी दूरवरुन भाविक मंदिराकडे येत होते. मंदिर परिसर व अवघे तुळजापूर या गर्दीने गजबजून गेले आहे. यात्रेकरुंना कोणताही त्रास सहन करावा लागू नये, यासाठी मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस प्रमुख अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे-घाटे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिलेल्या सूचनेनुसार गर्दीवर नियंत्रण ठेवत आहेत.
दरम्यान, काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या (दि. 20 रोजी) श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.
या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांच्या सहकार्याने एकत्रितपणे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विविध कामांच्या समन्वयासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचा दैनंदिनरित्या आढावा घेत असल्याने यात्रा काळात समन्वय राखणे शक्य झाले आहे. याशिवाय, यंदा प्रथमच तब्बल तीनशे तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांना आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत नवरात्र उत्सवात सेवा बजावण्यास सांगण्यात आले आहे. विविध ठिकाणी समन्वयाचे काम, तसेच गर्दी व्यवस्थापनाचे काम त्यांच्यावर देण्यात आले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते त्यांची सेवा बजावतानाचे चित्र पाहायला मिळाले.