पांगरी (गणेश गोडसे ) सैनिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह इतर 55 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना नारी ता.बार्शी येथे घडली.
विष्णु रामलिंग कुरूंद असे चोरी झालेल्याचे नांव आहे.पोपट कुरूंद यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,त्यांचे भाऊ विष्णु हे भारतीय सैन्यात असल्याने ते कुटुंबासह पुणे येथे राहत आहेत.त्यामुळे बंद घराचा गैरफायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील लोखंडी पेटी मध्ये ठेवलेली 9500 रुपये किमतीची लेडीज अंगठी,11 हजार रुपये किमतीची 4 ग्रॅमची सोन्याची अंगठी,27 हजार रुपये किमतीच्या 5 ग्रॅमच्या दोन अंगठ्या,पाच हजार रुपये किमतीचे टॉप्स,एक साखळी असा 55 हजार रुपयांचा माल कोणीतरी चोरट्याने लबाडीने चोरून नेला.
तसेच कुरूंद यांच्याप्रमाणेच गावातीलच शंकर अच्युत बदले याच्या घरातील लहान मुलांच्या पायातील चांदीच्या पट्ट्या,नारायण भास्कर शिंदे यांच्या घरातील पाच साड्या व रोकड,केसरबाई गव्हाने यांच्या घरातून साड्या व रोकड चोरट्यांनी लंपास केली.पांडुरंग आबा पाटील यांच्या घराचा पत्रा उचकटून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.पोपट कुरूंद यांच्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार धन्नप्पा शेटे हे करत आहेत.