उस्मानाबाद -  शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोईसाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांतून समाधान व्‍यक्‍त केले जात आहेत. वेगवेगळ्या मार्गावरुन येणाऱ्या तसेच कर्नाटक राज्यातील बस आगारांच्या बसेससाठी केलेल्या स्वतंत्र व्यवस्थेमुळे भाविकांचीही सोय झाली आहे. त्यामुळे भाविकांची संख्या दररोज वाढती असली तरी उत्कृष्ट नियोजनामुळे यावर्षी राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभाग आणि तुळजापूर आगाराकडून भाविकांना चांगली सेवा मिळत असल्याचे चित्र आहे.
   शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व विभागांना या नवरात्रोत्सवात सर्वोत्कृष्ट सेवा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. भाविकांची कोणत्याही दृष्टीने गैरसोय होणार नाही, याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रत्येक यंत्रणा कार्यरत आहेत. 
   राज्य परिवहन महामंडळानेही वाहतूकीचे नियोजन दोन टप्प्यात केले आहे. पहिला टप्पा दसऱ्यापर्यंत चालणार  असून दुसऱ्या टप्प्यात कोजागिरी पौर्णिमेसाठी विशेष वाहतूक दि.24 ते 30 ऑक्टोबर ,2015 पर्यंत करण्यात येणार आहे. भाविकांची गर्दी पाहता त्यांच्या सोयीसाठी पुरेशा एस.टी. बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या असून त्या नियमित सोडण्यात येत आहेत. कोणत्याही यात्रेकरुंची गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्व महामंडळातील अधिकारी-कर्मचारी घेत आहेत. 
    प्रथम सत्रात उस्मानाबाद विभागाकडून कर्नाटक राज्यातील वाहतूक व महाराष्ट्रातील सोलापूर,  बार्शी, लातूर, उस्मानाबाद व उमरगा व इतर मार्गावर वाहतूक करण्यासाठी 110 बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत तर द्वितीय सत्रातील पोर्णिमा वाहतूकीसाठी मुख्य दिवशी औरंगाबाद प्रदेशाकडून 690 बसेस, पुणे यांच्याकडून 350 अशा एकूण 1 हजार 40 बसेस नियोजनानुसार धावणार आहेत. 
    कर्नाटक राज्यातील वाहतूकीसाठी तुळजापूर आगारातील नवीन बस स्थानक हे वाहतूकीचे केंद्र आहे. या यात्रा वाहतूकीच्या नियोजनासाठी 3 पाळयामध्ये प्रत्येकी एक पर्यवेक्षक व तीन वाहतूक नियंत्रक आणि सकाळी 9 ते सांयकाळी 6 या पाळीमध्ये एक सहायक वाहतूक अधिकारी आणि वाहतूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून ते या सर्व बसेस वाहतूक नियोजन आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत.  
   नवरात्र कालावधीमध्ये नियोजनासाठी 10 अधिकारी यांच्यासह 60 पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच मार्ग तपासणी कामासाठी 21 पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर जुने बस स्थानकावरुन तुळजापूर-सोलापूर, तुळजापूर- उस्मानाबाद या प्रमुख मार्गावर वाहतूक केली जात आहे. येथेही तीन पाळीमध्ये अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. 
    भाविक हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी एस.टी.महामंडळाच्या वतीने जुन्या बस स्थानकावर तसेच नवीन बसस्थानकावर 24 तास वाहतूक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षिततेसाठी बसस्थानकावर पोलीस चौकी, जुन्या बसस्थानकावर क्लॉक रुमची व्यव
स्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षण कक्ष उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन भाविकांना एस.टी. बसेसनेच प्रवास करण्याचे आवाहन याठिकाणी करताना दिसत आहे. 

 
Top