उस्मानाबाद -  भाविक सहकुटुंब त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येतात. लाखो भाविक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा गर्दीच्या भाऊगर्दीत एखादा लहानगा, अथवा घरातील वृद्ध व्यक्ती त्या गर्दीत दुरावते. अशावेळी त्या कुटुंबातील इतर सदस्यांची अक्षरश: त्यांना शोधण्यासाठी धावपळ सुरु असते. अशावेळी या कुटुंबांतील सदस्यांना पोलीसांचे मदत केंद्र हा मोठा आधार ठरत आहे.
      एखादी व्यक्तीची या गर्दीत ताटातूट झाली की लगेचच त्या पोलीस चौकीत येऊन माहिती दिली की, पोलीस त्यांच्या शोधासाठी  तात्काळ ध्वनीक्षेपकावरुन सातत्याने माहिती देऊन आणि त्या नातेवाईंकाना धीर देत त्यांची एकमेकांची पुनर्भेट घडवून आणत आहेत. नवरात्र सुरु झाल्यापासून अशा तब्बल सातशे व्यक्ती चुकामुकीनंतर पुन्हा आपल्या कुटुंबियांसोबत त्यांच्या घरी रवाना झाल्या आहेत. एकमेकांची भेट झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या पोलीसांना कामाची पावती मिळाल्याचे समाधान देत आहे. 
          महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे दि.13 रोजी प्रारंभ झाला. पहिल्या दिवसापासूनच राज्यभरासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील भाविकांचा तुळजापूरकडे येण्याचा ओघ वाढला. काही भाविक तर चालत तुळजापूरकडे येत असल्याचे चित्र पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळाले. या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच पोलीस तसेच मंदिर संस्थानच्या यंत्रणेने चांगले प्रयत्न केले. भाविकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी फलक लावून तसेच स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शनासाठी मदत केली. मात्र, तरीही आजपर्यंतच्या आठ दिवसांत तब्बल सातशे जणांची त्यांच्या कुटुंबियांपासून चुकामूक  झाली. चुकामुक झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीला शोधाशोध करुनही संबंधीत व्यक्ती सापडला नाही तर पोलीस मदत कक्ष किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत होते. 
त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ संबंधीत व्यक्तीचे नाव, तो कोठला आहे याची माहिती ध्वनीक्षेपकावरुन देऊन त्या व्यक्तीने मदतकेंद्राजवळ येण्याचे आवाहन करीत होते. विशेष म्हणजे, संबंधीत नातेवाईकांनाही , तुम्ही माईकवर बोला, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल, असे सांगून त्यांना आवाहन करण्यास सांगत होते. याचा सकारात्मक परिणाम होऊन अशी चुकामुक झालेली अनेक जण सापडल्याची उदाहरणे या आठ दिवसात घडली. त्याची नोंदही या पोलीस मदत केंद्रांत केली जात होती. नवरात्र काळात 24 तास हे मदत केंद्र भाविकांच्या मदतीसाठी सुरु आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश आल्याचे पाहायला मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान उमटत होते.  तुळजापूर शहराच्या विविध भागात ही मदत कक्ष उघडण्यात आले. मंदिर, महाद्वार आणि घाटशीळ चौक येथे कार्यान्वित असणाऱ्या या पोलीस चौकीत एकूण सातशे व्यक्ती हरवल्याची नोंद झाली आणि विशेष  म्हणजे, त्या व्यक्ती सापडल्याचीही!
नवरात्रात पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे-घाटे, सहायक पोलीस अधीक्षक प्रियंका भगत-नारनवरे यांच्या अधिपत्याखाली पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्तासाठी  उस्मानाबाद जिल्ह्यातील 46 वरिष्ठ पोलीस अधिकारी व 500 कर्मचारी आणि सोलापूर, लातूर आणि खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 62 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 1 हजार कर्मचारी आणि 500 होमगार्ड या बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. त्यांच्या माध्यमातून पोलीस संपूर्ण तुळजापूर शहरात भाविकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत.
दरम्यान, या उत्सवादरम्यान विविध यंत्रणाही भाविकांना सोई-सुविधा मिळाव्यात यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपालिकेच्या वतीने शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बाहेरुन आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध ठिकाणी पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
मंदीर प्रशासनाच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठका घेऊन यात्रा कालावधीत सुयोग्य नियोजन करुन त्यांचे तंतोतत पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व विभाग आपली जबाबदारी चोख बजावत असल्यामुळेच या यात्रा कालावधीत भाविकांसाठी सज्ज असल्याचे दिसून आले.  

 
Top