उस्मानाबाद :- उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सरपंच व सदस्यांची बैठक शहरातील कॉंग्रेस संपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस आमदार मधुकरराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. चव्हाण म्हणाले की, निवडून आलेल्या पदाधिकारी व सदस्यांनी गावातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करुन ते प्रश्न सोडवावेत व विकास कामांचा आराखडा तयार करुन जनतेचे प्रश्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून मार्गी लावून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे यावेळी आ. चव्हाण म्हणाले.
यावेळी उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी, दाऊतपूर, नांदुर्गा, लासोना, बरमगांव, धुग्गी, बोरखेडा, काजळा, हिंगळजवाडी, आष्टी, भंडारवाडी, बेंबळी, महादेववाडी, विठ्ठलवाडी, बोरगांव, वानेवाडी, रामवाडी, दारफळ आदी गावातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीस जि.प. अध्यक्ष अॅड. धिरज पाटील, सुधाकर गुंड, कॉंग्रेसचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, दत्तात्रय सोनटक्के, मेहराज शेख, सत्तार शेख, अशोक मगर, संजय शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनिर्वाचित सरंपच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे यांनी केले आभार दत्ता सोनटक्के यांनी मानले.
